जिल्हा परिषद शाळांची वीजदेयके भरण्यास महापालिकेचा नकार; महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने विद्यार्थ्यांचे हाल

वसई- विरार महापालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांची वीजदेयके भरण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या शाळांतील विद्यार्थ्यांना अंधाऱ्या खोलीत बसून शिकावे लागत आहे. अनेक शाळांतील संगणक प्रशिक्षण त्यामुळे बंद झाले आहे.

वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अडीचशेहून अधिक शाळा आहेत, तर वसई-विरार महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या १३९ शाळा आणि ४१० अंगणवाडय़ा आहेत. जिल्हा परिषद शाळांची नेहमीच दुरवस्था असते. या शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या असून इतर अनेक गैरसोयींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतोय. पालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांचीदेयके  महापालिकेतर्फे भरण्यात येत होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही देयके भरण्यास आयुक्तांनी नकार दिला आहे. यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. निधी नसल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा महावितरणाने खंडीत केला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अंधाऱ्या खोलीत, विनापंख्याचे बसावे लागत आहे. विजेअभावी शाळांमधील संगणक बंद पडले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर होत आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका शिल्पा सिंग यांनी सांगितले. आयुक्त म्हणतात, जिल्हा परिषद शाळांना निधी देते. पण हा निधी वर्षांला जेमतेम १५ हजार असतो. त्यात शाळेची देखभाल, दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य आणि इतर कामांत खर्च होतो. मग वीजदेयके कशी भरणार, असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनीही जोरदार टीका केली आहे. एकीकडे पालिका जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे पालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहे. मग वीजदेयके भरण्यासाठी का नियम दाखवला जातो, असा सवाल त्यांनी आयुक्तांना केला आहे.

पालिका या शाळांची वीजदेयके भरत होती. मात्र अचानक पालिकेने वीजदेयके भरण्याचे बंद केल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. याबाबत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला आहे.  – शीतल पुंड, गटविकास अधिकारी, वसई पंचायत समिती