दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री कमालीचा उकाडा यामुळे ठाणेकर हैराण झाले असतानाच मंगळवारी रात्री उशिरा शहरातील सावरकरनगर, लोकमान्य नगर तसेच आसपासच्या भागांतील वीजपुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला होता. त्यामुळे येथील रहिवाशांच्या झोपेचे अक्षरश: तीनतेरा वाजले. विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित का झाला तसेच कधी सुरळीत होणार याची चौकशी करण्यासाठी नागरिकांनी महावितरण कंपनीच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता तेथे माहिती देण्यासाठी प्रतिनिधीच उपलब्ध होत नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला असून उष्म व दमट हवामानामुळे उकाडा जाणवू लागला आहे. यामुळे अंगाची काहिली होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. या वातावरणामुळे नागरिक हैराण झालेले असताना सावरकरनगर, लोकमान्यनगर, महात्मा फुलेनगर तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारी दिवसभरात सहा वेळा विद्युत पुरवठा खंडीत झाला. विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांना अधिक उकाडय़ाचा सामना करावा लागला. त्यातच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने हा भाग सर्वत्र अंधार बुडाला होता. तासभर वाट पाहूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तेथे एकही अधिकारी-कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच महावितरण कंपनीने सुरू केलेल्या टोल फ्री कमांकावर ‘आपला कॉल ग्राहक प्रतिनिधीशी जोडण्यात येत आहे. कॉल सुरू ठेवा..’ हीच टेप वारंवार वाजत होती.
वीजपुरवठा खंडित असताना महावितरण कर्मचारी उपस्थित नसल्याने रहिवाशांनी लोकमान्यनगर येथील महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. विद्युत रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला असून दीड तासात विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या संतापामध्ये आणखी भर पडली. यावेळी तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी येथील बंदोबस्त वाढवला.
गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक कारणास्तव मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रामधील टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना सेवा पुरविता आली नाही. मात्र, आता ही सेवा सुरळीत झाली आहे, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. एस. किन्नूर यांनी सांगितले.  
विद्यार्थ्यांना फटका
सावरकरनगर-लोकमान्यनगर तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारी रात्री ११ वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा पहाटे ३ वाजता सुरळीत झाला. त्यामुळे तब्बल पाच तास या भागात बत्ती गुल होती. महाविद्यालयीन तृतीय वर्ष आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. असे असतानाच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला.
नीलेश पानमंद, ठाणे