अत्यंत अनियमित सेवा आणि महागडे दर या वीज वितरण व्यवस्थेतील विषम परिस्थितीमुळे सध्या ठाण्यातील घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहक हैराण झाले आहेत. ठाण्यापासून बदलापूपर्यंत वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. अतिशय तकलादू वितरण व्यवस्था हे त्याचे ठळक कारण आहे. विजेचा असा खेळखंडोबा सुरू असताना अवास्तव दरवाढ करून महावितरणने आगीत तेल ओतले आहे..

ठाणे जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू झाल्यापासून जिल्हय़ातील रहिवाशांची विजेने सत्त्वपरीक्षा घेणे सुरू केले आहे. जिल्हय़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. मुसळधार पाऊस असल्याने वीजपुरवठा खंडित होत असावा आणि तासाभरात तो पुन्हा सुरळीत होईल, अशी अपेक्षा वीजग्राहकांकडून केली जात होती. मात्र दिवा परिसरात दररोज १२ तासांचा वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने येथील नागरिकांच्या संतापाला परिसीमा राहिली नाही. त्यातच गेल्या आठवडय़ात सुमारे ५० तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होऊन दिवा परिसर अंधारात बुडाला होता. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातही हीच परिस्थिती असून तेथील उद्योजकांना त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत.
अतिशय ढिसाळ वितरण व्यवस्था हे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही प्रकारे वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे या सर्व भागांतील वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणाची गरज निर्माण झाली आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नुकतेच या भागातील वितरण व्यवस्थेच्या सुधारण्यासाठी १०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र या भागातील विजेची समस्या सोडवण्यासाठी केवळ १०० कोटी रुपये पुरेसे नाहीत. येथील एकूणच यंत्रणा पुन्हा नव्याने उभारण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
जीर्ण वाहिन्या कारणीभूत
ठाण्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे इस्टेट परिसरात उद्योजकांकडून मोठय़ा प्रमाणात विजेची मागणी असते. मात्र येथे वीजपुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या जुन्या असल्याने या भागामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढत आहे. आठवडय़ात तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी सूचना देणारी यंत्रणाही कार्यान्वित नसल्याने कारखाने विजेअभावी बंद पडू लागले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये या भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडले. त्यामुळे येथील उद्योजकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. या परिसरातील वीजवाहिनींच्या नूतनीकरणाची गरज निर्माण झाली आहे. वीज वितरण व्यवस्थेतील या त्रुटीचा फटका आजही ठाणे शहरातील उद्योजक आणि रहिवाशांना सहन करावा लागतो आहे. या परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात अद्याप जुन्या यंत्रणांमधून वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील परिस्थिती सुधारण्यासाठी महावितरणने लक्ष देण्याची गरज आहे.
.. म्हणून दिव्यात ‘अंधार’
दिवा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागात वीज वितरणासाठी तीन उपकेंद्रांची आवश्यकता आहे. मात्र सध्या या भागात केवळ एकाच वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा करण्यात येत आहे. वाढीव विजेच्या मागणीचा ताण सहन होत नसल्याने दिव्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. शिवाय या परिसरात वीज वितरण यंत्रणा जुनाट झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यात सुधारणाही करण्यात आलेली नाही. महावितरणच्या वतीने या भागात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुमारे ३७ कोटी रुपये खर्चाची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र या भागातील स्थानिकांच्या उपद्रवामुळे दिव्यात काम करण्यासाठी ठेकेदारच येत नसल्याची कबुली महावितरणकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील वीज वितरणाची कामे अपूर्ण असून त्याचा फटका दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागातील उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर आणि वीजवाहिन्या उभ्या करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन महावितरणच्या समन्वयाने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरवाढीच्या संकटाचे संकेत
वीज वितरण व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्या तरी वीज बिलामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची घट होताना दिसत नाही. दिवसातून बारा तास वीज नसलेल्या भागातही फुगलेल्या रकमेची वीज बिले येत आहेत. जून महिन्यात महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यामुळे संपूर्ण जिल्हय़ातून संतापाची लाट उसळली आहे. सरासरी ५.५ टक्के इतकी वीज दरवाढ या प्रस्तावात करण्यात आली असून पुढील काळात ती आणखी वाढवण्याचे संकेत महावितरणच्या या वीज दरवाढीच्या प्रस्तावातून समोर येत आहेत. यामुळे ठाणे जिल्हय़ातील उद्योग क्षेत्रांनी मंडळाच्या या वीज दरवाढीविरुद्ध दंड थोपटले असून रहिवासी क्षेत्रातूनही या मनमानीविरुद्ध आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा वीज दरवाढ प्रचंड प्रमाणात होईल आणि तरीही पुरेशी वीज मात्र ग्राहकांना मिळणार नाही. मंडळाच्या या नियोजनशून्यतेचा ताण प्रामाणिक ग्राहकांच्या खिशावर पडू नये, असे वाटत असलेल्या प्रत्येकाने या वीज दरवाढीला विरोध करण्याची आवश्यकता आहे. वीज दरवाढीच्या प्रस्तावातील त्रुटीमुळे महाराष्ट्राची वीज देशातील सर्वात महागडी वीज ठरली आहे. आसपासच्या राज्यातील वीज दरांपेक्षा महावितरणची वीज प्रचंड महाग झाली आहे. गोवा राज्याच्या वीज दरांपेक्षा महाराष्ट्रातील वीज दर दुप्पट महाग आहे. या वीज दरवाढीमुळे ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेला तडा जाणार असून विविध पातळ्यांवरून उद्योजक हा मुद्दा राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बिलांची होळी करणे, शासनाकडे दरवाढीविरोधात मते मांडणे तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. त्यामुळे वीज दरवाढीविरुद्ध पुढील काही दिवसांमध्ये उद्योजकांकडून अधिक तीव्र स्वरूपातील आंदोलने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई, अंबरनाथ, मुरबाड, तळोजा, तारापूर पट्टय़ातील उद्योजकांनी या दरवाढीचा तीव्र निषेध केला असून त्याला जितका विरोध करता येईल तितका कठोर विरोध करण्यात येणार आहे.

कल्याणचीही अवस्था गंभीर
कल्याण आणि पलीकडच्या शहरातील वीज वितरण व्यवस्थेसाठी यापूर्वी महावितरणने वेगवेगळ्या योजना राबवल्या असल्या तरी त्याचे सकारात्मक परिणाम मात्र अद्याप समोर आलेले नाहीत. दाट लोकवस्तीच्या अनेक भागांमध्ये अद्याप वीज कंपनीची जुनी यंत्रणा कार्यान्वित आहे. वीज वितरण व्यवस्थेतील हा दोष सुधारण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश नुकतेच दिले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाकडे १८० कोटींच्या योजनांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील परिस्थिती सुधारण्याची शक्यता वाटत असली तरी हेसुद्धा मृगजळच आहे, कारण यापूर्वीही अशा कोटय़वधीच्या खर्चानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शिवाय हा निधी कधी प्राप्त होईल, याची नेमकी माहितीही उपलब्ध नाही. त्यामुळे पुढील आणखी काही वर्षे या भागातील ग्राहकांना अशाच प्रकारे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला तोंड द्यावे लागणार आहे.