वसई-विरारमध्ये चोरीची ३ हजार प्रकरणे; महावितरणला वर्षभरात साडेपाच कोटींचा फटका

वसई-विरार शहरात सध्या वीजचोरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आकडे टाकणे, मीटरमध्ये फेरफार करणे आदी प्रकारांद्वारे वीजचोरी केली जात आहे. महावितरणाने वीजचोरांवर धडक कारवाई सुरू केली असली तरी अद्याप ८६ हजार ग्राहक चोरीची वीज वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत महावितरणाने वीजचोरीची ३ हजारांहून अधिक प्रकरणे उघडकीस आणून तब्बल दीड हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र त्यांना ठोठावलेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या दंडापैकी केवळ पावणेदोन कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

महावितरणाच्या वसई सर्कलमध्ये वसई आणि विरार हे दोन विभाग येतात. त्यात साडेसात लाख वीज ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत आहे. या वाढत्या वीजचोरीने महावितरणाला सर्वात मोठा आर्थिक तोटा सहन कराववा लागत आहे. महावितरणाने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षांत वीजचोरीची ३,१६५ प्रकरणे उघडकीस आणली. वीज चोरणाऱ्या ग्राहकांना ५ कोटी ३७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर दीड हजार ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत आकडे टाकून वीज चोरण्याचे १, ६९३ प्रकरणे उघडकीस आणले. अशा ग्राहकांना ९४ लाख रुपयांचा दंड  आकारण्यात आला. त्यापैकी ६९० ग्राहकांनी ३४ लाख रुपयांचा दंड भरला तर १ हजार ४९ ग्राहकांवर भारतीय वीज कलमाअंतर्गत ( इंडियन इलेक्ट्रीक अ‍ॅक्ट) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकारही वाढत आहे. महावितरणाने मीटरमध्ये फेरफार करून, बेकायदा जोडणी घेऊन वीज चोरण्याची १,०५६ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. यात २ कोटी २९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यापैकी ३२२ जणांनी दंड भरला, तर १८२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

भरारी पथकाची स्थापना

वसई आणि विरार सर्कल मिळून ९ उपविभाग आहेत. प्रत्येक विभागातील उपअभियंत्याला महिन्याला १० वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्याये लक्ष्य देण्यात आलेले आहे. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणाने स्वतंत्र असे भरारी पथक नेमले आहे. त्यात दोन अभियंते मिळून ४ जणांचा समावेश असतो, याशिवाय वसई सर्कलचे भरारी पथक आहे. त्यात ९ अभियंत्यांचा समावेश आहे. हे भरारी पथक दर बुधवारी आणि मंगळवारी छापे टाकून वीजचोरीची पाहणी करत असते. महावितरणाने गेल्या आर्थिक वर्षांत ९५ हजार ग्राहकांच्या वीजजोडणी खंडित केल्या, त्यापैकी ९ हजार जोडण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

चालू वर्षांतही वीजचोरी

  • एप्रिल २०१७ ते जून २०१७ या तीन महिन्यांतही ५०० हून अधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
  • त्यात आकडे टाकून वीजचोरीचे ३३१ आणि मीटरमध्ये फेरफार केल्याच्या २१६ प्रकरणांचा समावेश आहे.
  • आकडे टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी १९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
  • त्यापैकी २७ ग्राहकांनी २ लाखांचा दंड भरला तर ११० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • मीटर फेरफार प्रकरणात ४१ लाख ६ हजार रुपयांचा दंड आकारला असला तरी केवळ ९ लाख रुपये वसूल झाले आहेत.

किती वीजचोरी?

  • आर्थिक वर्ष एप्रिल २०१६ ते मार्च २०१७
  • एकूण वीजचोरी : ३ हजार १६५ प्रकरणे
  • एकूण दंड : ५ कोटी ३७ लाख रुपये
  • वसूल : १ कोटी ८८ लाख रुपये
  • दाखल गुन्हे : १,२३१
  • आकडे टाकून वीजचोरी : १,६९३ प्रकरणे
  • ठोठावलेला दंड : ९४ लाख रुपये
  • वसूल दंड : ३४ लाख रुपये (६९० ग्राहकांकडून)
  • मीटरमध्ये फेरफार : १,०५६ प्रकरणे
  • ठोठावलेला दंड : २ कोटी २९ लाख रुपये
  • वसूल दंड : १ कोटी २० लाख ( ३२२ ग्राहकांकडून)
  • गुन्हे दाखल : १८२ ग्राहकांवर
  • बेकायदा जोडणी : ४१६ प्रकरणे

१६ टक्क्यांचा तोटा

वसई सर्कलला महिन्याला सव्वादोनशे ते अडीचशे दशलक्ष युनिट एवढी वीज लागते. मागील आर्थिक वर्षांत २ हजार ७६१ दशलक्ष युनिट एवढी वीज वापरली गेली, मात्र वीजचोरीचा मोठा आर्थिक फटका महावितरणाला बसत आहे. गेल्या वर्षी १६.४५ टक्के एवढा तोटा महावितरणाला सहन करावा लागला.