विद्युत खांबांवर आकडे टाकून सर्रास वीजचोरी; तांत्रिक बिघाडांमुळे अघोषित भारनियमनाची वेळ
विद्युत खांबांवरील तारांवर आकडे टाकून वीजचोरी करण्याचे प्रकार वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले असून वीज मंडळाच्या कारवाईनंतरही वीजचोर बधेनासे झाले आहेत. सर्वाधिक वीजचोरी नालासोपाऱ्यात होत असून बेकायदा चाळींना अशा प्रकारे वीज पुरवण्याचा धंदा सर्रास सुरू आहे. मात्र, आकडे टाकून वीज चोरण्याच्या प्रकारांमुळे विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
नालासोपारा पूर्वेला मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर वसाहती वाढल्या आहेत. या चाळींना अधिकृत वीज जोडण्या मिळत नाहीत. त्यामुळे चाळमाफिया विद्युत खांबांवर आकडे टाकून वीजचोरी करत आहेत. त्यासाठी प्रत्येक जोडणीमागे ते पैसे घेत असतात. महावितरणने वीेजचोरीविरोधात मोहीम उघडली असली तरी वीजचोरीचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. यामध्ये वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सहभागही आहे. आकडे टाकून वीजचोरी मोठय़ा प्रमाणावर केली जात असते. याशिवाय दुसऱ्याच्या अधिकृत मीटर बॉक्समधून वीजचोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणे आदी प्रकार होत आहेत. वीज मंडळातील अनेक कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असून मीटरमध्ये फे रफार करून रीडिंग स्लो केली जात असते.
नालासोपारा पूर्वेच्या तांडापाडा येथील एका विद्युत खांबावर शेकडो आकडे टाकून वीजचोरी सुरू आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आक डे टाकून वीजचोरी होत असल्याने या भागातील विद्युत जनित्राचा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत नालासोपारा विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हनुमंत ढोक यांच्याशी संपर्क साधला असता वीजचोरांविरोधात दररोज कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांत नालासोपारा विभागातील ३८४ वीजचोरीचे प्रकरण उघडकीस आणले आहेत. यातील ४० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले. वीजचोरीमुळे ताण पडून वीजपुरवठा खंडित होत असतो आणि त्यामुळे सतत भारनियमन करावे लागते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
एक दिवसात मीटर देणार
वीजचोरीला आळा घालण्यासाठी वीज मंडळाने थकबाकीदारांना एक दिवसात नवीन मीटर देण्याची योजना आणली आहे. त्यानुसार ज्यांची थकबाकी असेल आणि ज्यांची वीज जोडणीे कापली असेल त्यांनी पूर्ण रक्कम भरली तर त्यांचे व्याज माफ केले जाईल आणि त्यांना एक दिवसात नवीन मीटर दिले जाईल, असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हनुमंत ढोक यांनी सांगितले. अशा पद्धतीने वीजचोरी करणे जिवावर बेतू शकते त्यामुळे वीजचोरी करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.