पालिकेकडून काम सुरू; अपघात टाळणे शक्य

विरार पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येथील उड्डाणपुलावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक उद्वाहन बांधण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.

विरार पूर्वेहून पश्चिमेला जाण्यासाठी आजवर नागरिकांना रेल्वे फाटकातून रूळ ओलांडावा लागत असे. त्यामुळे अनेकांचे रेल्वे अपघातात बळी गेले होते. पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाइलाजाने हे रूळ ओलांडावे लागत होते. २०१४ साली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र या पुलावर चढण्यासाठी पायऱ्याच बांधण्यात आल्या नाहीत. पुलामुळे वाहनचालकांची सोय झाली, मात्र पादचाऱ्यांसाठी तो निरुपयोगी ठरला आणि त्यांची फाटकातून सुरू असलेली कसरत कायम राहिली.

पायऱ्या बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. पालिकेने उद्वहन (लिफ्ट) लावण्याचा पर्याय सुचवला होता. जानेवारीत महापौरांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर पालिकेने या पुलावर उद्वहन बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पुलाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना उद्वहन बसविण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली. चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला.

विरार पूर्वेकडील नागरिक उद्वहनातून पुलावर जातील. तिथे पालिकेने पदपथ बांधला आहे. त्यावरून चालत पश्चिमेकडील उद्वहनात बसून पश्चिमेला उतरायचे आहे. म्हणजे नागरिकांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी दोन वेळा उद्वहनांचा वापर करावा लागणार आहे. उद्वहन लावल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांचा पायऱ्या चढण्याचा त्रास वाचणार आहे.

–  राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार पालिका