आदिवासींचा हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा

बुलेट ट्रेन आणि पालघर जिल्ह्य़ात येऊ घातलेले विविध विनाशकारी प्रकल्पांसाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, अशी घोषणा करत हजारो आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. ‘बुलेट ट्रेन’विरोधात आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली धिक्कार मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकल्पाविरोधातील रोष मोर्चेकऱ्यांमध्ये दिसत होता.

बुलेट ट्रेन ज्या गावातून जाणार आहे, अशा गावांमध्ये ग्रामस्थांचा जमिनी प्रकल्पास देण्यासाठी विरोध असतानाही बुलेट ट्रेन प्रकल्पामार्फत गावकऱ्यांवर दडपशाही आणून पोलिसांच्या दबावाखाली सर्वेक्षण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आदिवासी एकता परिषदेसह हा धिक्कार मोर्चा काढला.

‘आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत आणि विस्थापित व्हायचे नाही, तसेच आम्ही त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही,’ असे या मोर्चात सामील असलेल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला आपला कायम विरोध असून तो येथील आदिवासींना विस्थापित करणारा आहे, असे आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे यांनी सांगितले.  या मोर्चाची तीव्रता पाहता प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

१५० पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला पोलीस कर्मचारी आणि अतिशिघ्र कृती दल यांचा त्यात समावेश होता.