कुळगांव – बदलापूर पालिकेची यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरली असून रोज नवे-नवे प्रशासकीय निर्णय पालिकेत येत आहेत. त्यांचे पालन करताना उमेदवार जेरीस आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकूण वीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद केले होते. त्यात जातपडताळणी प्रमाणपत्र जोडले नसल्याने बाद करण्यात आलेले काही अर्ज होते. परंतु, या बाद झालेल्यांपैकी जातपडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावर चार उमेदवार कल्याण सत्र न्यायालयात गेले असता न्यायालयाने त्यांना पात्र ठरविले. त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यांच्यासाठी १३ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तर १४ एप्रिलला निवडणूक चिन्हवाटपाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम घोषित केल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला पोच होताच त्यांनी कुळगांव – बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्राच्या प्रकरणासंदर्भात कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून अंतिम निर्णय घ्यावयाचा असल्याने सत्र न्यायालयाने अपील मान्य केलेल्या प्रभागांचा सुधारित निवडणूक कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या या आदेशांमुळे अपील मान्य झालेल्या प्रभागांच्या बाबतीत पुढील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने येथील उमेदवारांचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागले आहे. तसेच वारंवार कायदेशीर प्रक्रियेत गुंतल्याने प्रचार कधी आणि कसा करणार, असा उमेदवारांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे पूर्ण जोमाने या उमेदवारांना प्रचार सुरू करता आला नसून प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याने या उमेदवारांच्या छातीत धडकी भरली आहे. दरम्यान, याबाबत कुळगांव – बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट मागितली असता त्यांनी शिपायाकरवी निरोप पाठवत पालिकेच्या कनिष्ठ लिपिकाकडून या निर्णयाची प्रत देण्यास सांगितले. परंतु त्यांची भेट देण्यास असमर्थता व्यक्त केली. प्रभाग क्रमांक ३४ मधील ललिता जाधव यांना जातपडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून अपात्र ठरविण्यात आल्याने त्या कल्याण सत्र न्यायालयात गेल्या होत्या. परंतु पात्र ठरल्यानंतर सुधारित निवडणूक कार्यक्रम घोषित झाला.