लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक; शहरात ११२७ खाटा शिल्लक तर १२०० खाटांचे नवे रुग्णालय

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असली ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेण्याचा पर्याय स्वीकारला आहे. महापालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत पाच हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी शहरातील पालिका तसेच खासगी रुग्णालयात एकूण २६२९ खाटा उपलब्ध आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची संख्या कमी असली तरी रुग्णालयात जेमतेम दीड हजार रुग्ण उपचार घेत असल्याने महापालिकेच्या यंत्रणांना अजूनही भार असह्य़ झालेला नाही.

जवळपास साडेतीन हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. यापैकी काही रुग्णांना अगदीच सौम्य तर काहींना कोणत्याही प्रकारचे लक्षण नाही. ठाणे महापालिका हद्दीत पालिका आणि खासगी रुग्णालयातील ११२७ खाटा रिकाम्या आहेत. दरम्यान, रुग्णवाढीचा वेग लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या वाहनतळामध्ये उभारलेले १२०० खाटांचे रुग्णालय दोन दिवसांत चालू करण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात सहाशे ते सातशे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी दिवसभरात ७७४ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. शहरात करोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिका आणि खासगी अशी एकूण १८ रुग्णालये आहेत. त्यामध्ये रुग्ण उपचारासाठी एकूण २६२९ खाटा उपलब्ध आहेत. परंतु शहरात सद्य:स्थितीत ५ हजार १८ सक्रिय रुग्ण आहेत. त्या तुलनेत रुग्णालयातील खाटांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. असे असले तरी पालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये केवळ १ हजार ५०२ रुग्ण उपचार घेत असून उर्वरित साडेतीन हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. शहरात असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयातील १,१२७ खाटा रिकाम्या आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. शहरात दररोज पाच हजारांच्या आसपास करोना चाचण्या केल्या जात असून त्याचबरोबर, ताप तपासणी सर्वेक्षण, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, घरीच उपचार घेणाऱ्यांच्या घरावर फलक लावणे अशा उपाययोजना पालिका करीत आहे. याशिवाय, पालिकेच्या करोना नियंत्रण कक्षातून घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्या तब्येतीचा आढावा घेतला जात असून त्यासाठी २५ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.

घोडबंदर, नौपाडा, वर्तकनगर करोना केंद्र

महापालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात ७७४ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी उच्चभ्रू वसाहती असलेल्या घोडबंदर भागात दोनशे तर, वर्तकनगर आणि नौपाडा भागातील प्रत्येकी शंभर रुग्णांचा समावेश आहे. यामुळे हे परिसर शहरातील करोनाचे केंद्र बनल्याचे चित्र आहे. मात्र, या भागात करोना रुग्णसंख्येत नेमकी कशामुळे वाढ होत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.