ऑनलाइन कार्यक्रमांच्या आयोजनावरच भर

ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून शहरातील सांस्कृतिक कट्टे मैदान, उद्यान तसेच सभागृहात भरविले जात नसून त्यापैकी अनेक संस्थांनी ऑनलाइनचा वापर करून कट्टे सुरू ठेवण्याची परंपरा जपली आहे. करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने हे कट्टे पुन्हा मैदान, उद्यान तसेच सभागृहात घेण्याचा विचार संस्थांनी सुरू केला होता. मात्र, काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली असून यामुळे शहरातील कट्टे प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे.

ठाणे शहराला गेले अनेक वर्षांपासून कट्ट्यांची परंपरा लाभली आहे. आचार्य अत्रे कट्टा, ब्रह्मांड कट्टा, भटकंती कट्टा, कुसुमाग्रज कट्टा, विज्ञान कट्टा अशा विविध कट्ट्यांवर सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, भटकंती, सांगीतिक यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी ठाणेकरांना अनुभवण्यास मिळते. मात्र, गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली होती. त्यामुळे शहरातील मैदान, उद्यान तसेच सभागृहात भरणारे कट्टे बंद झाले होते. मात्र, करोनाच्या काळातही ठाणेकरांचे मनोरंजन व्हावे यासाठी विविध संस्थांनी ऑनलाइनच्या माध्यमातून कट्टे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाइन स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कट्ट्याचा प्रेक्षकवर्ग वाढला असला तरी प्रत्यक्ष कट्ट्यांवर जमणारी मैफल, रसिकांशी घडणारा थेट संवाद या गोष्टींची उणीव कट्टा संस्थापकांना जाणवत होती. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी महिन्यात करोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागल्यानंतर कट्टा संस्थापकांनीही मैदान, उद्यान तसेच सभागृहांत कट्टे सुरू करण्याचा विचार सुरू केला होता. त्यासाठी कट्टा संस्थापक तयारीलाही लागले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम, आंदोलन, मोर्चे यांवर बंदी घातली. त्यामुळे प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या या कट्ट्यांना पुन्हा ऑनलाइनचा आधार घ्यावा लागणार आहे.

करोनाचा परिणाम

गेल्या वर्षी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू केली होती. यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस होणारे सांस्कृतिक कट्ट्यांवरील कार्यक्रमही बंद झाले होते. या काळात, काही कट्टा संस्थापकांनी ऑनलाइन स्वरूपात कार्यक्रम सुरूच ठेवले तर अनेक कट्टा संस्थापकांना ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करणे सोयीस्कर वाटले नाही. त्यामुळे वर्षभरापासून कट्टे बंद असून त्यामध्ये कुसुमाग्रज कट्टा आणि भटकंती कट्टा या कट्ट्यांचा समावेश आहे.