शासकीय केंद्रांमध्ये मात्र लशींचा तुटवडा

ठाणे : जिल्ह्य़ातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या प्रमुख शहरांमध्ये लशीच्या तुटवडय़ामुळे मंगळवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली असतानाच ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरात खासगी रुग्णालयांमार्फत दिवसभरात १५ हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुधवारी जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात रडतखडत लसीकरण मोहीम सुरू होती. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लसीकरण मोहीम विनाअडथळा सुरू होती. यामुळे शासकीय केंद्रे कोमात तर, खासगी केंद्रे जोमात असेच चित्र शहरात दिसून येत आहे.

ठाणे महापालिका प्रशासनाने लशींच्या तुटवडय़ामुळे मंगळवारी लसीकरण बंद ठेवले होते. शहरात प्रामुख्याने कोव्हिशिल्ड लशींचा तुटवडा जाणवत आहे. शहरातील ४० केंद्रांवर पालिकेने बुधवारी लसीकरण सुरू ठेवले होते. त्यापैकी दोनच केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस दिली जात होती. उर्वरित ३७ केंद्रांवर ४५ पुढील वयोगटाच्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लशीची दुसरी मात्रा दिली जात होती. शासनाकडून लससाठा उपलब्ध झाला नसल्यामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारीही लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. उपलब्ध साठय़ातून उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात रडतखडत लसीकरण सुरू होते. बदलापूरमध्ये मात्र लसीकरण बंद होते. ठाणे ग्रामीण भागात ४० हून अधिक लसीकरण केंद्रे असून त्यापैकी केवळ ९ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. ग्रामीण क्षेत्रासाठी पाच हजार लशींचा साठा जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहे. परंतु भिवंडी, अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहीम सुरू असल्यामुळे या ठिकाणी करोना लसीकरण बंद ठेवण्यात आले. शहापूर तालुक्यासह सर्वच रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू ठेवले आहे. एकूणच जिल्ह्य़ातील शासकीय केंद्रांवर लस तुटवडय़ामुळे तसेच विविध कारणांमुळे लसीकरण मोहीम रखडखडत सुरू असल्याचे चित्र आहे. असे असतानाच ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरात खासगी रुग्णालयांमार्फत वेगाने लसीकरण सुरू असून या रुग्णालयांनी मंगळवारी दिवसभरात १५ हजार ८३७ अधिक नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यात १५ हजार ५८६ नागरिकांना कोव्हिशिल्ड लस तर, २५१ नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.