News Flash

नोटा बदलण्यासाठी रोजंदारांची नेमणूक

दलालांची साखळी सक्रिय; दिवसाला ५०० रुपयांची कमाई

प्रातिनिधिक छायाचित्र

दलालांची साखळी सक्रिय; दिवसाला ५०० रुपयांची कमाई

ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील बडे उद्योजक, बिल्डर तसेच व्यापारी आणि धनिकांची चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांच्या रदबदलीसाठी चक्क रोजंदारी कर्मचाऱ्यांची नेमणुक केल्याचे चित्र दिसू लागले आहे. बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करणाऱ्या बिगारी कामगारांप्रमाणे दिवसाला ५०० रुपयांच्या रोजंदारीवर यासाठी कामगारांची नियुक्ती केली जात असून दिलेले पैसे कोणत्याही अफरातफरीशिवाय परत यावेत याची काळजी घेण्यासाठी मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची निवड केली जात आहे.

या नोटा बँकेत भरण्यासाठी रोजंदारीवर महिला, तरुण मंडळींना कामाला लावले आहे. एका वेळेस चार हजार रुपये बँकेतून काढून आणा त्याबदल्यात काही ठिकाणी दोनशे रुपये दिले जात असून अशा बडय़ा धनिकांनी आपले एजंट बँकांबाहेर उभे केले आहेत. या प्रकारामुळे बँकेतील गर्दी वाढू लागली असून सर्वसामान्य नागरिकांना रांगेत तिष्ठत रहावे लागत आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यामुळे त्या बदलून घेण्यासाठी तसेच बँकांच्या खात्यात पैसे भरण्यासाठी नागरिकांनी विवीध शाखांमध्ये गर्दी केली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना खातेधारकांना खात्यावर पैसे भरता येणार आहेत. मात्र, भरलेले पैसे खात्यातून काढताना विशिष्ट रकमेची मर्यादा आखून देण्यात आली आहे.

रोज नव्या बँकेत..

महिला, तरुण मंडळींना बँकामध्ये जाऊन हे पैसे भरण्यास सांगितले जाते. बँकामध्ये नोटा जमा करुन त्या बदली करण्याचे काम त्यांना दिले आहे. त्याबदल्यात त्यांना दिवसाला दोनशे ते पाचशे रुपयांचा रोज दिला जातो. बँकांच्या बाहेर या बडय़ा मंडळींचे एजंट उभे असतात. बँकामधून पैसे घेऊन आल्यानंतर लगेच या एजंट मंडळींच्या हाती पैसे द्यावे लागतात. तेथेच त्यांना दोनशे रुपये मिळत असल्याने अनेक महिला सकाळी सात वाजल्यापासूनच बँकांच्या बाहेर गर्दी करतात. बँक कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात येऊ नये म्हणून या महिला रोज वेगवेगळ्या बँकामध्ये जातात. जुन्या नोटा बदलून आणण्याचा हा आयता रोजगार मिळू लागल्याने हे काम मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. पाच ते सहा तास रांगेत उभे राहून २० हजार रुपये बदलून आणले तरी हजार रुपयांचे कमिशन हाती पडत असल्याने गरीब वस्त्यांमधील नागरिकांना हा नवा रोजगार मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:55 am

Web Title: employee appointed for currency change
Next Stories
1 शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
2 आहे मनोहर तरी..
3 मसाजच्या जाहिरातीमुळे हत्येचा उलगडा
Just Now!
X