आठ तासांच्या नोकरीसाठी आठ तासांचा प्रवास; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची येण्या-जाण्यातच दमछाक

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : टाळेबंदीच्या शिथिलतेनंतर बसमध्ये वाढलेली गर्दी, रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरांतून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह नोकरदार वर्गाचा प्रवास आठ तासांचा झाला आहे. कामाच्या कालावधीइतकेच म्हणजेच आठ तास प्रवासात खर्ची पडत असल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हा प्रवास नकोसा वाटू लागला आहे. या प्रवासामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा या कर्मचाऱ्यांचा शीण वाढला असून यामुळे कामात पुरेसे योगदान देता येत नसल्याचीही खंत हे कर्मचारी व्यक्त करत आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी असली तरी बदलापुरातून सुमारे साडेतीन हजार, तर अंबरनाथमधून दोन हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दररोज रुग्णालये, महापालिका आणि इतर कार्यालयांमध्ये कामावर जात आहेत. रेल्वे वाहतूक बंद असल्याने त्यांना बसने प्रवास करावा लागत आहे. टाळेबंदीत रस्ते मोकळे असल्याने दोन ते अडीच तास लागत होते, मात्र गेल्या तीन दिवसांपासून इतर क्षेत्रांतल्या आस्थापनाही सुरू झाल्याने कर्मचारी संख्येत वाढ होऊन बसमध्ये गर्दी होऊ  लागली आहे. त्यात अनेक कर्मचारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. या कोंडीमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या तसेच नोकरदार वर्गाच्या बस प्रवासासाठी आता ६ ते ८ तास लागत आहेत. खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांनाही इतकाच वेळ लागत आहे.

घरातून सकाळी सहाच्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडल्याने १५ मिनिटे रांगेत उभे राहून बसमध्ये सुटसुटीत जागा मिळते. मात्र त्यानंतरही कार्यालयात पोहोचण्यासाठी साडेदहा ते अकरा वाजतात. सातनंतर बस मिळाल्यास १२ वाजेच्या आत आम्ही कार्यालयात पोहोचू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नायर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिली. तर सकाळी ६ वाजता घर सोडल्यानंतर रात्री ८ नंतरच आम्ही घरी पोहोचतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत आमचे १४ ते १६ तास खर्ची पडत असल्याने एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक शीण जाणवत असल्याचे मुंबई महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

खासगी वाहनाचा प्रवासही खर्चीक

बसमधली असुरक्षितता टाळायची असल्याने अनेक कर्मचारी स्वत:च्या दुचाकीने मुंबईतील कार्यालय गाठतात. मात्र यातही दोन ते अडीच तास लागत असून दिवसाला ३५० ते ४०० रुपयांचे पेट्रोल लागते. त्यामुळे सुरक्षितता हवी तर खर्च आणि शारीरिकश्रमही वाढत असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत.

इथे जातो सर्वाधिक वेळ

बदलापूर, अंबरनाथ, कल्याणहून भिवंडी बाह्यवळण रस्त्याने मुंबई गाठताना कल्याणचा दुर्गाडी पूल, कोन गाव रस्ता, आनंदनगर चेकनाका आणि विक्रोळीजवळचा पूल या ठिकाणी कोंडी असते. येथे दररोज सुमारे अडीच ते तीन तास वाया जात असल्याचे कर्मचारी सांगतात.