गैरप्रकारांची वाच्यता करू नये यासाठी कंपनीची खेळी; आधार, पारपत्रासह अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात

किशोर कोकणे, ठाणे</strong>

गुंतवणूकदारांच्या ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गुडविन कंपनीचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे. कंपनीतील गैरप्रकार समोर येऊ नये किंवा कंपनीविरोधात कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करू नये यासाठी माजी कर्मचाऱ्यांचे पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे कंपनीने काढून घेतली आहेत.कागदपत्रे कंपनीकडे जमा असल्याने शैक्षणिक पात्रता असूनही चांगल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये सुनीलकुमार अकराकरण, सुधिरकुमार अकराकरण यांनी गुडविन ज्वेलर्सच्या शाखा सुरू  केल्या. भिशी आणि ठेवींवर जादा व्याजदर मिळावे यासाठी अनेकांनी शेकडो जणांनी आयुष्याची पुंजी या कंपनीत गुंतवली आहे. मात्र, अचानक गुडविन ज्वेलर्सच्या सर्व शाखा बंद झाल्याने या गुंतवणूकदारांवर मोठे संकट आले आहे. याप्रकरणी ठाण्यात १६८, डोंबिवलीत ५४ आणि अंबरनाथमधील ५२ तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींनुसार ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील रामनगर आणि अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुमारे सात कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. फसवणुकीचा आकडा कोटय़वधीच्या घरात असल्याने या प्रकरणाचा तपास मंगळवारी रात्री ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने पोलिसांनी कंपनीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यास सुरुवात केली आहे. या कर्मचाऱ्यांचे मूळ कागदपत्रेच कंपनीने जमा केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिन्यांचे वेतनच दिले गेले नव्हते. कंपनीत सामील होत असताना कर्मचाऱ्यांकडून आधारकार्ड, पारपत्र, पॅनकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीच घेतल्या होत्या. मात्र, नोकरी असल्याने अनेकांनी यासंबंधी कंपनीला विचारणा केली नव्हती. वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना नोकऱ्या सोडताना मूळ कागदपत्रे दिली गेली नाहीत. मूळ कागदपत्रे कंपनीकडे जमा असल्याने अनेकांना शैक्षणिक पात्रता असूनही साध्या कंपनीत नोकरी करावी लागत आहे, तर अनेकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावा लागल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

कर्मचाऱ्यांनाही खोटी आश्वासने

कंपनीत नोकरी लागली त्या वेळी कर्मचाऱ्यांनाही आमिष दाखविले गेल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सलग तीन वर्षे काम केल्यानंतर ५० हजार रुपये अधिक मिळणार, असे सांगितले गेले होते. त्यामुळे अनेकांनी या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती, असेही तो म्हणाला. कंपनीकडून होणाऱ्या शोषणाविरोधात अनेक कर्मचाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्याचेही ते म्हणाले.

या कंपनीत सध्या काम करत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतनच दिले गेले नाही. कर्मचाऱ्यांनाही आज-उद्या वेतन होईल, असे सांगितले जात होते.

– एस. आहेर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे.