करोना संसर्ग टाळण्यासाठी गटागटाने प्रवास

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : मुंबई, नवी मुंबई, वसई परिसरातील खासगी, सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीसाठी जाणारे कल्याण, डोंबिवलीतील बहुतांशी चाकरमानी समूह प्रवासाला पसंती देत आहेत. खासगी वाहनांमधील आसनक्षमता पाहून एका शहरातील ठरावमक भागातील पाच ते सात प्रवासी खासगी वाहनाने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘खिशाला थोडा खर्च पडला तरी चालेल, पण सुरक्षित प्रवास करू’ हा विचार करून हा समूह प्रवास केला जात आहे.

तिसऱ्या आणि त्यानंतरच्या टाळेबंदीच्या काळात बहुतांशी खासगी, सरकारी आस्थापनांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश काढले. लोकल बंद असल्याने बेस्ट बस हा एकमेव पर्याय होता. मात्र बसना तुडुंब गर्दी. या गर्दीत करोनाचा संसर्ग होण्याची भीती. त्यामुळे अनेक कर्मचारी बस थांब्यावर जाऊन तेथील गर्दी पाहून दररोज घरी परतत होते. काही महिला, पुरुष कर्मचाऱ्यांची त्या गर्दीत शिरण्याची हिंमत होत नव्हती. कार्यालयातून उपस्थित राहण्यासाठी वरिष्ठांचा दबाव वाढू लागल्यानंतर अनेक कर्मचारी अस्वस्थ झाले. कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत तर वेतन मिळणार नाही अशा सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील एका भागात राहणारे नोकरदार प्रवासासाठी गटागटाने एकत्र आले आहेत. एखाद्या नोकरदाराची मोटार पाच आसनी तसेच सात आसनी असेल तर इंधनासाठी लागणाऱ्या खर्चात भागीदारी करून कल्याण, डोंबिवलीतून मुंबई परिसरातील कार्यालयात प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. पाच किंवा सातही नोकरदारांच्या मोटार असतील तर एका आठवडय़ाला एकाने वाहन बाहेर काढायचे. त्याने शहरातील निश्चित थांब्यावरून सहप्रवासी नोकरदारांना घेऊन त्यांच्या कार्यालय भागात सोडायचे. शेवटी तो नोकरदार वाहनचालक अंतिम ठिकाणी त्याच्या कार्यालयात वाहन घेऊन जाईल, असे सूत्र ठरविण्यात आले आहे. पुन्हा संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर शेवटच्या ठिकाणचा नोकरदार वाहनाने सहप्रवाशांना त्यांच्या थांब्यावरून घेऊन परतीचा प्रवास करीत आहेत. त्याच्या पुढील आठवडय़ात अन्य नोकरदाराने आपले वाहन बाहेर काढून सहप्रवाशांसह आठवडाभर प्रवास करायचा. असे पाच ते सहा दिवस मोटार मालक नोकरदार मुंबईत प्रवास करत आहेत. एक आठवडय़ाला तीन ते साडे तीन हजार रुपये पेट्रोल खर्च येतो.  वाहन कोंडीत गाडीत उभी राहते त्याचा फटका बसतो. हा खर्च पाच ते सहा प्रवाशांमधून विभागला जातो, असे रुपाली मुजुमदार या नोकरदार महिलेने सांगितले.

पेट्रोल भागीदारी

मागील दीड महिन्यापासून कल्याण, डोंबिवलीतून सुमारे अडीच ते तीन हजार समूह प्रवासाची (कार पूल) वाहने मुंबई, नवी मुंबई, वसई परिसरात प्रवास करत आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर सोबतचे पाच ते सात प्रवासी सोडले तर या प्रवासात कोणाचा संपर्क येत नसल्याने आणि पेट्रोल भागीदारीतील हा प्रवास तुलनेने सुकर होत असल्याने अनेक महिला, पुरुष नोकरदार या प्रवासाला आता सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.