३८ हजार नळजोडणींच्या मीटर रीडींगसाठी केवळ २७ कर्मचारी

मीरा-भाईंदर शहरात पालिकेने आजवर सुमारे ३८ हजारांहून अधिक नळजोडण्या दिलेल्या आहेत. परंतु या नळजोडण्यांना बसवलेल्या मीटरची तपासणी करण्यासाठी पालिकेकडे अवघे २७ कर्मचारीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना कोणतेही तांत्रिक शिक्षण देण्यात आलेले नाही. परिणामी अनेक इमारतींना अवाच्या सवा पाणी कराची देयके येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

नळजोडणीधारकाला तसेच संबंधित इमारतीला दर तीन महिन्यांनी पाणीकराचे देयक पाठविण्यात येत असते. देयक पाठविण्याआधी प्रत्येक नळजोडणीवर बसविण्यात आलेल्या मीटरची तपासणी करून त्यावरील पाणीवापराची नोंद महापालिकेच्या मीटर रीडरने करायची असते. मात्र महापालिकेकडे केवळ २७ मीटर रीडर असून शहरातील ३८ हजारांहून अधिक मीटरची नोंद घेण्याचे काम मीटर रीडर करत असतात. याचा अर्थ एका मीटर रीडरला एक हजाराहून अधिक मीटरची तपासणी करून त्याची नोंद घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र अवघ्या २७ मीटर रीडरना ही जबाबादारी पेलवत नसल्याने हे मीटर रीडर अनेक इमारतींपर्यंत पोहोचतच नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी रहिवाशांना पाण्याची भरमसाट देयके येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. पाण्याचे मीटर जर नादुरुस्त झाले असले तर महापालिका अशा नळजोडण्यांसाठी सरासरी देयक पाठवत असते. परंतु अनेक इमारतींची मीटर सुरू असतानाही त्यांना वाढीव देयके येत आहेत. मीटर रीडर मीटरची तपासणी न करताच अंदाजे देयके पाठवत असल्याचे रहिवासी सोसायटय़ांचे म्हणणे आहे. नळजोडण्यांच्या तुलनेत मीटर रीडरची संख्या तुटपुंजी असल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवाय बहुतांश मीटर रीडर हे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी असून त्यांनी मीटरची नोंद घेण्याचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही. आजपर्यंतच्या अनुभवावरच ते काम रेटत आहेत. पाण्यासोबत येणारा कचरा, माती यामुळे पाण्याची मीटर अनेक वेळा बंद पडत असतात. ही मीटर दुरुस्त करून घेण्याची कोणतीही यंत्रणा मीरा-भाईंदरमध्ये उपलब्ध नाही. मीटर दुरुस्तीसाठी मुंबईला जावे लागत असल्याने अनेक रहिवासी मीटर दुरुस्त करून घेण्यास टाळाटाळ करतात. परिणामी या रहिवाशांना सरासरी देयके पावण्यात येत असल्याने त्यांना आर्थिक भरुदड बसत आहे. महापालिकेने मीरा-भाईंदर शहरातच मीटर दुरुस्तीची कार्यशाळा सुरू करावी अशी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मीटर रीडर मीटरची नोंद घेण्यासाठी येत नसल्याच्या अनेक रहिवासी सोसायटय़ांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे तसेच मीटर रीडरसोबतही स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येणार आहे.

– प्रशांत दळवी, सभापती, पाणीपुरवठा समिती.