ग्राहकांच्या नकळत एटीएम कार्ड स्कीमर यंत्रात टाकून माहितीची चोरी

वसई : एटीएम यंत्राला स्कीमर बसवून ग्राहकांचा डाटा चोरी करण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत, मात्र दुकानात आलेल्या ग्राहकांच्या नकळत त्यांच्या एटीएम कार्डाचे क्लोनिंग करण्याची अनोखी पद्धती विरारमधील ठकसेनांनी शोधून काढली आहे. खरेदी झाल्यानंतर एटीएम कार्डाद्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांच्या नकळत त्यांचे कार्ड स्कीमर यंत्रणेत टाकून डाटा चोरी करण्यात येत होता. अर्नाळा सागरी पोलिसांनी याप्रकरणी ‘गेमिंग झोन’ या दुकानात काम करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे.

एटीएम केंद्रात स्कीमर उपकरण लावून क्लोनिंग करण्याच्या घटना सर्वत्र घडत असतात. परंतु एटीएम कार्डाचे क्लोनिग करणे कुठेही शक्य असल्याचे एका प्रकरणावरून उघड झाले आहे. अर्नाळा सागरी पोलिसांनी चंद्रगुप्त मोर्या (२७) आणि मिहीर ताऊ (२७) या दोन तरुणांना नुकतीच अटक केली. त्यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. मिहीर हा मुंबईतील एका मॉलमध्ये असलेल्या ‘गेमिंग झोन’ या दुकानात कामाला होता. जे ग्राहक पैसे देण्यासाठी एटीएम कार्ड देतात, त्यांची कार्ड तो नकळत स्कीमर यंत्रात टाकून त्याचा डाटा चोरी करत होता. स्वाइप यंत्रात ग्राहकाने कार्ड स्वाइप केल्यानंतर त्यांच्या एटीएमचा पिन क्रमांकही गुपचूप टिपून घेत होता. अशा प्रकारे चोरून गोळा केलेला एटीएम कार्डामधील डाटापासून तो एटीएम कार्डाचे क्लोनिंग करत असे. त्याचा साथीदारर चंद्रगुप्त मोर्या याच्या मदतीने त्याने विरारमधील एटीएम केंद्रातून १ लाख २० हजार रुपयांची रक्कम काढली होती. मात्र ग्राहाकने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली.

हे दोन्ही आरोपी विरारमध्ये राहतात. एटीएम कार्डाचे क्लोनिंग करून सहज पैसे काढता येतात हे त्यांना समजले. त्यांनी यू-टय़ूबवर त्याचे प्रात्याक्षिक पाहिले. त्यानंतर ऑनलाइन वस्तूविक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून १५ हजार रुपयांचे स्कीमर आणि १५ हजार रुपयांचे रीडर मागवले होते. सीसीटीव्ही नसलेले एटीएम केंद्र हेरून ठेवत होते. एखाद्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन केल्यानंतर सहा  महिन्यानंतर त्याचा गैरवापर करून पैसे काढत होते, अशी माहिती विरारचे पोलीस उपधीक्षक जयंत बजबळे यांनी दिली.

सावधगिरीच्या सूचना

एटीएम कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी उपअधीक्षक बजबळे यांनी नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. दुकानात, हॉटेलात, पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड स्वाइप करण्यासाठी दिल्यानंतर त्यावर लक्ष ठेवा. विक्रेत्याच्या समोरच कार्ड स्वाइप करा. चुकूनही आपला पिन क्रमांक कर्मचाऱ्याला सांगू नका, असे ते म्हणाले. या दोन आरोपींनी किती कार्डाचे क्लोनिंग केले आणि किती ठिकाणांहून रकमा काढल्या त्याचा पोलीस शोध घेत आहेत.