मुंबईच्या प्रवासाकरिता तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ

भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनची सेवा बंद असली तरी नोकरदार वर्गाला कामावर जाणे आता भाग झाले आहे. परंतु मीरा भाईंदरहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अभाव असल्याने नागरिकांना बस पकडण्याकरिताच तब्बल एक ते दोन तास वाट पाहावी लागत आहे.

मीरा भाईंदर शहरातून मोठय़ा प्रमाणात अनेक नागरिक कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. करोनामुळे राबवण्यात आलेल्या टाळेबंदी नियमांना शिथिल करत प्रशासनाकडून व्यवसायाला चालना देण्यावर जोर दिला जात आहे. त्यामुळे आता अनेक उद्योगधंदे आणि कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. दळणवळण करण्याकरिता रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे  बस सेवेवर संपूर्ण ताण निर्माण झाला आहे. त्यात बसमध्ये प्रवास करण्याकरिता २५ प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु मीरा भाईंदर शहरातून प्रवाशांना बसची  कमतरता भासत आहे.

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने बीईएसटीच्या बस गाडय़ा सुटतात. त्यात बोरिवली, दिंडोशी आणि वांद्रे करिता गाडय़ा जातात. परंतु यात मोठय़ा प्रमाणात गाडय़ा  दिंडोशीपर्यंतच जात असून त्यापुढे केवळ एकच सी—७२ क्रमांकाची बस जाते. परंतु या बस गाडय़ा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रोज नागरिकांना बस पकडण्याकरिता लांबच लांब रांग लावावी लागत आहे. तरीदेखील बस मिळत नसल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना  उन्हा—पावसात उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून दखल घेऊन रेल्वे सेवा सुरू होईपर्यंत बस गाडय़ात वाढ करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

करोनाचे संकट डोक्यावर असतानादेखील कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु बस उपलब्ध नसणे तसेच सामाजिक अंतरचे पालन न होणे अशा अनेक समस्या असताना नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.

शहर परिवहन सेवा वापरण्याची मागणी

नोकरदार वर्गाला बसची कमतरता भासत असल्यामुळे बस गाडय़ांच्या संख्येत वाढ करण्याकरिता तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेची स्वतंत्र असलेली परिवहन सेवा वापरण्यात यावी म्हणून मी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे अशी माहिती आमदार गीता जैन यांनी दिली.

बस मिळत नसल्यामुळे मला रिक्षाने प्रवास करावा लागतो. माझ्या उत्पन्नाचा मोठा भाग प्रवासामध्ये जात आहे. परंतु नोकरी जाण्याच्या भीतीमुळे मी हा प्रवास करतोय.

– प्रफुल कासारे, प्रवासी

बसकरिता तासभर  वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर बस येणार की नाही हा प्रश्न असतो. परंतु लोकल ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे आमचा नाइलाज आहे.

– प्रवीण परमार, प्रवासी