विक्रमगडमधील १० गावांमधील महिला बचत गटाचा उपक्रम

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड तालुक्यातील १० गावांमधील ३०० आदिवासी महिलांनी बांबूच्या पातीपासून देखण्या, नमुनेदार ५० हजार राख्या तयार केल्या आहेत. नैसर्गिक बाज असलेल्या या राख्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

भाईंदर-उत्तन येथील केशवसृष्टीमधील ग्रामोद्योग विभागाचे पालघर जिल्ह्य़ातील वाडा, विक्रमगड, मोखाडा, जव्हार तालुक्यातील आदिवासी दुर्गम ७५ गावांत ग्राम, कुटिरोद्योग विकासाचे काम चालते. या उपक्रमात शहरी भागातील एक सुशिक्षित तरुण आदिवासी गावातील एका गावाशी जोडण्यात आला आहे.

करोना विषाणूमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा परिस्थितीत महिलांच्या हातांना काम आणि त्यांना तात्काळ रोजगार कसा उपलब्ध होईल असा विचार विक्रमगड जवळील टिटवली गाव दत्तक घेतलेल्या गौतम श्रीवास्तव तरुणाने केला. गावातील महिला, पुरुषांशी संवाद साधून त्यांची कौशल्य जाणून घेतली. गावकरी बांबूपासून विविध वस्तू तयार करू शकतात हे लक्षात आल्यावर या महिलांना बांबूपासून राख्या बनविण्याचा आराखडा दिला. महिलांना बांबूपासून राख्या बनविण्याचे प्रशिक्षण, राख्यांचे अभिकल्प (डिझाइन) दिले. प्रशिक्षणानंतर बांबूच्या पात्यांपासून टिटवलीतील ३० महिलांनी अभिकल्पाचा आधार घेत नमुनेदार राख्या तयार केल्या. ग्रामोद्योग विभागाने राख्या बनविण्यासाठी विक्रमगडमधील नऊ गावांतील महिला बचत गटांची निवड केली. दोन महिन्यांच्या काळात बांबूच्या पातीपासून ५० हजार राख्या तयार केल्या आहेत. त्यासाठी लागणारे वेलबुट्टी, रंगीत पृष्ठभागाचे (कॅनव्हॉस) सामान ग्रामोद्योगाने पुरविले.  ५० हजार राख्यांच्या माध्यमातून किमान सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल. यामधील ग्रामोद्योग विभागाने केलेला खर्च वगळून उर्वरित सर्व उत्पन्न महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. तयार राख्या विलेपार्ले येथील

उत्कर्ष संस्थेत विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांशी राख्या पोस्टाच्या गतिमान सेवेने परिचित, नातेवाईक, कार्यकर्ते यांना पाठविण्यात आल्या आहेत. मोठय़ा गृहसंकुलात विक्री केली जात आहे. काही कार्यकर्ते बोरिवली ते वांद्रे रेल्वे स्थानक भागात या राख्यांची विक्री करीत आहेत.

आदिवासी महिला, पुरुष अतिशय मेहनती, कष्टकरी आणि उत्तम ग्रहणशक्ती असलेले आणि त्यांना एकदा दिशा दिली की त्यांच्या अंगभूत कौशल्यातून ते नावीन्यपूर्ण वस्तू तयार करतात. अनेक उपक्रम या भागात सुरू आहेत. या माध्यमातून राख्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

मुकेश पाध्ये, ग्रामोद्योग विभाग, केशवसृष्टी, भाईंदर