कर्जाचे हप्ते, घर चालवण्याचा प्रश्न, सहायकही निराधार

बदलापूर : करोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यात टाळेबंदीपूर्वीच शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. तेव्हापासून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांपुढेही रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा लवकर सुरू होण्याची शक्यता धूसर असल्याने कुटुंब चालवायचे कसे आणि कर्जावर घेतलेल्या बसचे हफ्ते फेडायचे कसे, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर बसमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी असलेल्या आया आणि सहायकही बेरोजगार झाले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ातील उपनगरांमध्ये अनेक शाळांनी आपल्या स्वत:ची बस वाहतूक व्यवस्था न उभी करता खासगी बसमालकांना हाताशी धरत करार पद्धतीने त्यांना सेवेत घेतले आहे. त्यामुळे अनेक चालकांनी बँकांकडून कर्ज घेऊन स्वत:च्या बसेस शाळांच्या सेवेत रुजू केल्या आहेत.

सध्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सुमारे ५०० लहान, मोठय़ा बस कार्यरत आहेत. मात्र टाळेबंदीत गेल्या दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस एकाच जागेवर धूळखात उभ्या आहेत. टाळेबंदी असूनही करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा सुरू करण्याचा विचार इतक्या लवकर होईल असे वाटत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या या बस चालक आणि मालकांपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने आपल्या कामगारांना वेतन द्यावे, असे सांगितले आहे. मात्र कर्जावर घेतलेल्या बसचे हफ्ते फेडणे आता अशक्य झाले असून आवक नसल्याने चालक आणि सहायकांचे वेतन द्यायचे कसे असा सवाल मालकांपुढे आहे. त्यात ज्यांनी कर्ज काढून स्वत:च्या बस घेतल्या त्यांची देखभाल दुरुस्तीची चिंता त्यांच्यापुढे आहे. मे महिन्यात आमच्या बसची तपासणी करत परिवहन विभाग आम्हाला परवाना देत असते. टाळेबंदीत ही प्रक्रिया बंद असली तरी जेव्हाही ही प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी ही तपासणी करण्यासाठी बसचालकांकडे पैसे नसतील. त्यामुळे या प्रक्रियेला स्वस्त कशी करता येईल याबाबत विचार करण्याची मागणी अंबरनाथ बदलापूर स्कूलबस चालक-मालक वेल्फेअर असोसिएशनच्या लक्ष्मीकांत कोसंदर यांनी केली आहे. दरम्यान पैशांअभावी विमा, कर्जाचे हफ्ते आणि इतर करांमध्ये या बसमालकांना सूट देण्यासाठी आतापासूनच प्रक्रिया करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी केली आहे.