25 February 2021

News Flash

इमू योजनेची कर्जवसुली सुरूच

सरकारने योजना गुंडाळली, तरीही बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

सरकारने योजना गुंडाळली, तरीही बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

बदलापूर : काही वर्षांपूर्वी इमूपालन व्यवसायाच्या नावाखाली बहुउद्देशीय योजना राज्यातल्या शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आली होती. इमूपालनातून मोठी कमाई होईल या शासनाच्या दाव्यानंतर शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेत योजना राबवली. कालांतराने ही योजना बिनकामाची असल्याचे कळताच शासनाने ही योजना गुंडाळली. योजना गुंडाळण्यात आली असली तरी त्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अजूनही बँकांकडून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

१३ वर्षांपूर्वी शेतक ऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून इमूपालन योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. इमू प्राण्याच्या माध्यमातून विविध प्रकारे उत्पन्न मिळेल, असा दावा करत राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँका आणि खासगी पतपेढय़ांकडून कर्जपुरवठाही उपलब्ध करून देण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायात उडी घेऊन लाखो रुपये गुंतवले. मात्र इमूपालन एक पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याचे कळताच अनेक शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. कालांतराने अनेकांनी हे प्राणी जंगलात सोडून आपली सुटका करून घेतली. या फसलेल्या योजनेसाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या अंगावर कायम आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर या कर्जाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी बँकेच्या आर्थिक तिमाहीत कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात.

नुकतेच जानेवारी महिन्यात ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याबाबत नोटिसा प्राप्त झाल्या आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ५१ शेतकऱ्यांनी जवळपास पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. योजना गुंडाळली गेली असली तरी त्यासाठीचे कर्ज अजूनही माफ करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांसमोर या कर्जाचे संकट कायम आहे.

कर्जाची रक्कम दुप्पट

मुरबाड तालुक्यातील खेवारे गावातील राघो आप्पा सुरोसे यांनी इमूसाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांना जानेवारी महिन्यात पुन्हा कर्जवसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. ५ लाख तीन हजार १०४ इतकी थकबाकी तर तितकेच व्याज अशी १० लाख रुपयांची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. योजना संपली असली तरी या काळात कर्जाची रक्कम मात्र दुप्पट झाली असून त्यामुळे शेतकरी त्रासले आहेत.

ही योजना गुंडाळली गेली असली तरी जिल्हा बँकांची कर्जवसुली झालेली नाही. शासनाने गेल्या वर्षांपर्यंत याबाबत वसुली न करण्याचे सांगितले होते. मात्र पुन्हा याची वसुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया म्हणून वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

राजेंद्र दोंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:24 am

Web Title: emu farming schemes loan recovery continues from farmers zws 70
Next Stories
1 ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्षी मृतावस्थेत
2 १७१९ फेरीवाल्यांना ‘आत्मनिर्भर निधी’
3 ठाणे जिल्ह्य़ात भाजपची सरशी
Just Now!
X