मार्गात हजारो बेकायदा चाळी; कडोंमपाच्या राखीव भूखंडावरही अतिक्रमण
डोंबिवली ते कल्याण शहराबाहेरून खाडी किनाऱ्यालगत जाणाऱ्या बाह्य़वळण रस्त्याच्या प्रस्तावित मार्गात भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. शेतक ऱ्यांनी बाह्य़वळण रस्त्यासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविली असली तरी भूमाफियांच्या चाळी या नियोजित मार्गामधील मोठा अडसर ठरणार आहेत.
डोंबिवलीतील आयरे, मोठागाव, देवीचा पाडा, गरिबाचा पाडा, कुंभारखाणपाडा, चोळे, कांचनगाव, पत्रीपूल, कल्याणमधील उंबर्डे, गंधारे, बारावे, वडवली, आंबिवली ते मांडा, टिटवाळा असा २६ किलोमीटर लांबीचा हा बाह्य़वळण (रिंगरूट) रस्ता आहे. गेल्या आठ वर्षांपासून या रस्त्याचे काम निधीची अडचण तसेच जमिनीचे संपादन यांसारख्या कारणांमुळे प्रलंबित आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी विचारात घेऊन आयुक्त ई. रवींद्रन यांनी हा महत्त्वाचा रस्ता मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या रस्तेकामाची अनेक वर्षे लालफितीत असलेली नस्ती बाहेर काढण्यात आली आहे. रस्त्यासाठी किती जमीन संपादित करावी लागेल? तसेच त्यांना किती मोबदला द्यावा लागेल? हा अंदाज काढण्यासाठी विकास आराखडय़ातील या प्रस्तावित रस्त्याची मोजणी करण्याचे काम महापालिकेने भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून सुरू केले आहे. महापालिकेने जमिनींच्या बदल्यात विकास हस्तांतरण हक्क वितरित केला तर शेतकरी या प्रस्तावित बाह्य़वळण रस्त्यासाठी जमिनी देण्यास तयार आहेत. डोंबिवलीतील शिवाजीनगर (देवीचा पाडा) भागातील शेतकऱ्यांसोबत आयुक्तांच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
शेतक ऱ्यांनी स्वखुशीने जमिनी दिल्या तरी बाह्य़वळण रस्त्याच्या मार्गात अनेक भूमाफिया, गावगुंड, काही आजी, माजी नगरसेवकांच्या समर्थकांनी बेकायदा चाळी तसेच गाळे उभारले आहेत. देवीचा पाडा भागात खाडी किनाऱ्यालगत वळण रस्त्याच्या मार्गात महापालिकेचा ४० एकरचा भला मोठा भूखंड चौपाटीसाठी राखीव आहे. या भूखंडासह लगतच्या भागात गेल्या पाच वर्षांत सुमारे एक हजाराहून अधिक बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. अशीच परिस्थिती कांचनगाव, उंबर्डे, आंबिवली, कोळिवली, मांडा, टिटवाळा भागात आहे.
जमीन पडीक राहिल्यानेच चाळींची बांधकामे..
वळण रस्त्याची जमीन अनेक वर्षे पडीक राहिल्याने याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे २६ किलोमीटर वळण रस्त्याची जमीन संपादन करताना महापालिकेला भूमाफियांशी मोठा संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.