महापालिकेच्या विकास आराखडय़ात सार्वजनिक सुविधांसाठी अनेक आरक्षणे असतात. ही आरक्षणे मागील वीस वर्षांत हडप करण्यात आली आहेत. आरक्षित भूखंड नसल्यामुळे नागरिकांना उद्याने, बगीचे, मैदानांपासून वंचित राहावे लागते. प्रचाराच्या सभेसाठी कल्याण पूर्व भागात एकही मैदान नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यावर बसावे लागत आहे. लोकांना रस्त्यावर आणणाऱ्यांना आता मतदारांनीच रस्त्यावर आणावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सत्ताधारी शिवसेनेचा नामोल्लेख टाळत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर विश्वास ठेवा आणि भाजपला भरभरून मतदान करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कल्याण पूर्व भागातील भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंकजा मुंडे शिवाजी कॉलनी भागात आल्या होत्या. या वेळी आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र सूर्यवंशी, रिपाइं नेते अण्णा रोकडे उपस्थित होते.
कल्याण पूर्व भागातील निवडणूक विचारांनी लढवली जात आहे. विचारांना मतदान केले जाते. हे खूप आशादायी चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर विश्वास ठेवून येथील जनतेने भाजप उमेदवारांना भरभरून मते द्यावीत. भाजपची एकहाती सत्ता आली तर या शहराचा सर्वागीण विकास करणे शक्य होणार आहे, असे आवाहन मुंडे यांनी केले.
मागील काही महिन्यांत कल्याण पूर्व भागातील विकासकामांसाठी आपण २३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार, पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली तर या भागात विकासाची गंगा आणणे सहज शक्य होणार आहे, असे मुंडे यांनी सांगितले.