भिवंडीतील ग्रामीण भागातील कुटुंबांची उपेक्षा

निश्चलनीकरण आणि चलनतुटवडा यामुळे आदिवासी पाडय़ांवर जशी परिस्थिती ओढवली आहे, तशीच अवस्था ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाची झाली आहे. बँकेच्या खात्यात जमा केलेले आपलेच पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना घरापासून, गावापासून दूर असलेल्या बँकेत तीन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. आधीच सुटय़ा पैशांची चणचण आणि त्यात बँकेत जाण्यासाठी होणारा खर्च यामुळे ‘पैसे नकोत, पण प्रवास आवरा’ असे म्हणण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.

[jwplayer eW0sv8sU]

भिवंडी तालुक्यातील अनगाव येथे परिसरातील दहा किलोमीटर परिघातील गावपाडय़ांमधून दररोज महिला बँकेत नोटा बदलण्यासाठी येत आहेत. मात्र त्यांना अद्याप पैसे बदलून मिळालेले नाहीत. हाती असलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बाजारात चालत नाहीत. सुट्टे पैसे नसल्याने जीवनावश्यक वस्तूही त्यांना घेता येत नाहीत. इतकेच काय, अनगावला बँकेत येण्यासाठी बससाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे दररोज त्यांना पायपीट करावी लागते. अनगाव येथील युनियन बँक तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनेक महिला गेले काही दिवस नोटा बदलण्यासाठी रांगा लावतात, मात्र त्यांपैकी बहुतेकांना पैसे मिळू शकलेले नाहीत.

[jwplayer iDXlg0Hk]