News Flash

वसईच्या मराठमोळ्या नाताळ सणावर इंग्रजीची झालर

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून नाताळच्या आगमन काळाला सुरुवात होते.

नाताळचे पूर्वरंग :  सुहास बिऱ्हाडे

‘कॅरल सिंगिंग’मध्ये आता मराठीऐवजी इंग्रजी गाण्यांवर भर :- नाताळ सणाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी नाताळ गीते अर्थात कॅरल सिंगिंग गायली जातात. वसईत पूर्वीपासूनच कॅरल सिंगिंगमध्ये मराठी गाणी अधिक प्रचलित होती. मात्र आता बदलत्या काळानुसार कॅरल सिंगिंगमध्ये मराठी गाण्यांऐवजी इंग्रजी गीतांचा समावेश होऊ लागला आहे. इंग्रजी माध्यमांत शिकणाऱ्या तरुणांमुळे हा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून नाताळच्या आगमन काळाला सुरुवात होते. त्याला एडव्हेट काळ म्हणतात. या आगमन काळाच्या पहिले तीन आठवडे पुनरागमनाचे असतात. तर तिसऱ्या आठवडय़ापासून प्रत्यक्ष आगमन काळाला सुरुवात होते. १७ डिसेंबरपासून २५ डिसेंबर हा नऊ  दिवसांचा आगमन काळ असतो. ‘प्रभू येशूचं आगमन होणार आहे, तयारीला लागा,’ असे गात तरुणांचे पथक गावागावांमध्ये फिरून आनंदाची गाणी म्हणतात. त्याला ‘कॅरल सिंगिंग’ असे म्हणतात. कॅरल सिंगिंगमध्ये तरुण मुले-मुली सार्वजनिक ठिकाणी विविध वादकांसह गीते गातात. ही गाणी येशूच्या जन्माची, गौरवगीते, आनंद व्यक्त करणारी गीते आणि स्तुती करणारी गीते असतात. या गाण्यांमुळे गावागावात उत्साहाचे आणि आनंदाची वातावरण निर्मिती केली जाते. प्रत्येक धर्मग्रामातील (पॅरीश) चर्चमधून सध्या कॅरल सिंगिंगचा सराव सुरू आहे. १७ डिसेंबरपासून तरुणांचे गट कॅरल सिंगिंग करत गावागावात, नाक्यांवर गाणी म्हणत ख्रिस्त आगमनाची वर्दी देणार आहेत. मराठी संस्कृती आणि परंपरा हे वसईच्या नाताळचे वैशिष्टय़ आहे. मात्र बदलत्या काळामुळे ही मराठी संस्कृती झाकोळल्याचे दिसून येत आहे. आता मात्र मराठी गाणी कमी आणि इंग्रजी गाण्यांचा समावेश अधिक होऊ  लागला आहे. ‘ऱ्हिदम वसईकर’ ही संगीत प्रशिक्षण देणारी संस्था तरुणांना कॅरल सिंगिंगचे प्रशिक्षण देते. या संस्थेचे प्रमुख मेल्विन डाबरे यांनी सांगितले की, सध्या मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. पूर्वीच्या मराठी कॉन्व्हेंट शाळाही इंग्रजी झालेल्या आहेत. त्यामुळे इंग्रजी गाणी वाढली आहेत.

मराठी गाणी हे वसईच्या कॅरल सिंगिंगचे वैशिष्टय़ होते. इंग्रजी गाणी अधिक आहे. मात्र मराठी गाणीही मोठय़ा प्रमाणात गायली जातात, असे फादर नीलेश तुस्कानो यांनी सांगितले.

कॅरल सिंगिंग काय आहे?

कॅरल सिंगिंग म्हणजे आनंद गीते. फ्रेंच भाषेतील कॅरोलि या शब्दापासून कॅरल सिंगिंग हा शब्द तयार झाला आहे. पहिले कॅरल सिंगिंग ऑस्ट्रेलियात गायले गेले होते, अशी माहिती फादर नीलेश तुस्कानो यांनी दिली. ‘सायलन्ट नाइट’ हे ते कॅरल गाणे होते. त्याचे हिंदी भाषांतर ‘वो प्यारी रात’ असे होते. मराठीतील पहिले कॅरल गीत ‘सुखाची ही रजनी, सुखाची ही कहाणी’ असे होते. फ्रान्सिस असिसी यांनी जगातले पहिला नाताळ गोठा उभारला. तो जिवंत नाताळ गोठा (क्रिप) होता. तेव्हापासून कॅरल सिंगिंगची प्रथा सुरू झाली. कॅरल सिंगिंग करणारे पथक बॅण्डच्या तालावर जागोजागी फिरून ख्रिस्त आगमनाची वर्दी देत असतात.

मराठी गाणी

कॅरल सिंगिंगमध्ये ‘आज गव्हाणी जन्मले बाळ’, ‘प्रभू जगाचा तारक आला’, ‘प्रभूरायाचे स्तवन करा’, ‘हर्ष करा, जल्लोष करा’, ‘ख्रिस्त प्रभू जन्मा आला’, ‘स्वर्गातून धावला, धन्य ती रजनी’ ही मराठी गाणी गायली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:15 am

Web Title: english fringe on vasai maratha christmas festival akp 94
Next Stories
1 सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनासाठी यंत्राची निर्मिती
2 नाना-नानी पार्कमध्ये नाना समस्या
3 वैविध्यपूर्ण विषयांवरील एकांकिकांच्या सादरीकरणाची उत्कंठा
Just Now!
X