दिसायला आकर्षक, शांत स्वभाव, उत्तम कामगिरी करण्याचे कसब आणि श्वानप्रेमींमध्ये आवडते शो डॉग अशी ओळख जपणारे इंग्लिश सेटर श्वान जगभरात लोकप्रिय आहेत. पंधराव्या शतकात इंग्लंडमध्ये या श्वानांची उत्पत्ती आढळते. एकोणिसाव्या शतकापासून जगभरात या श्वानांचा जगभरात प्रसार होण्यास सुरुवात झाली. उत्तम कामगिरी करणारे श्वान आणि शो डॉग असे या श्वानांचे दोन प्रकार आहेत. पूर्वी इंग्लंडमध्ये लहान प्राणी, पक्ष्यांच्या शिकारीसाठी इंग्लिश सेटर श्वानांचा वापर केला जात होता. बंदुकीने मारलेली शिकार शोधून शिकाऱ्यापर्यंत आणून देण्याचे काम इंग्लिश सेटर श्वान करत असत. यामुळे उत्तम कामगिरी करणारे श्वान अशी या श्वानांची ओळख आहे. तसेच आपला आकर्षक रंग आणि दिसण्यामुळे डॉग शोमध्ये हे श्वान आकर्षण ठरतात. विशेष म्हणजे वासावरून शिकार ओळखून पकडण्यात हे श्वान तरबेज असतात. यासाठी आपत्तिव्यवस्थापनाच्या कामात ढिगाऱ्याखाली सापडलेली व्यक्ती किंवा वस्तू शोधून काढण्यासाठी इंग्लिश सेटर या श्वानांचा वापर करण्यात येतो. या श्वानांची उंची २६ ते २८ इंचांपर्यंत असते. विशिष्ट कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्वानांच्या शरीरावर केसांचे आवरण कमी असते. तसेच डॉग शोजमध्ये वापरल्या जाणाऱ्या श्वानांचे लांब कान, लांब केस असतात.

निगा राखणे जोखमीचे

या श्वानांची निगा उत्तमरीत्या राखणे आवश्यक असते. दिसायला डॉबरमन श्वानांच्या उंचीप्रमाणे हे श्वान असले तरी हे नाजूक श्वान ब्रीड आहे. त्यामुळे घरी पाळताना या श्वानांची निगा उत्तमरीत्या राखणे गरजेचे असते. याशिवाय दररोज निगा राखणे श्वानपालकांच्या दृष्टीने जोखमीचेही आहे. केसांच्या वाढीसाठी उत्तम प्रकारची प्रथिने, कॅल्शिअम या श्वानांना पुरवणे गरजेचे असते. अशा उत्तम दर्जाची निगा राखणे खर्चीक असल्याने या श्वानांना घरी पाळण्याचे प्रमाण कमी दिसून येते.

भारतामध्ये हे श्वान पाळण्याचे प्रमाण कमी दिसून येते. तुलनेने आयरिश इंग्लिश सेटर हे श्वान अधिक प्रमाणात पाळले जातात. मुख्य पांढरा रंग आणि त्यावर सोनेरी, काळा अशा वेगवेगळ्या रंगांचे पट्टे यामुळे हे श्वान अधिक आकर्षक वाटतात. शरीरावर असणाऱ्या केसांमुळे दररोज या श्वानांच्या केसांवरून हात फिरणे गरजेचे आहे.

आजाराची काळजी

थायरॉईडसारखे आजार या श्वानांना होण्याची शक्यता असते. अनेक श्वानांना कर्करोगासारखे आजार उद्भवले आहेत. यासाठी परदेशातत ब्रीडिंग करताना महत्त्वाची काळजी घेतली जाते. इंग्लिश सेटर या पिलांच्या जन्मदात्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार ब्रीडिंग केले जाते. मायक्रोचिप, डीएनए या माध्यमातून संबंधित माहिती मिळवली जाते. साधारण सात ते आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर असे आजार जडण्याची शक्यता असते. यासाठी श्वानपालकांनी श्वानांच्या वेळोवेळी तपासण्या करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण उत्तम दिल्यास हे श्वान कोणतीही गोष्ट पटकन शिकतात. मात्र दरम्यान घ्याव्या लागणाऱ्या प्रचंड काळजीमुळे या श्वानांना घरात पाळण्याचा कल कमी दिसून येतो.

आदर्श पाळीव श्वान

शारीरिकरीत्या नाजूक असले तरी एखाद्या धावणाऱ्या प्राणी, पक्ष्याला पकडण्याचे या श्वानांचे कसब असते. वासावरून वस्तू शोधण्यासाठी हे तरबेज असतात. त्यामुळे घरात पळतानाही त्यांची चपळता दिसून येते. घरात पाळण्यासाठी हे आदर्श पाळीव श्वान म्हटल्यास हरकत नाही.