विद्यार्थी पटसंख्येत वाढ व्हावी आणि मुलांचा मराठी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढावा यासाठी कल्याणच्या सुभेदारवाडा शाळेने १९९६-९७ मध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले. सुरुवातीच्या काळात फक्त आठवी ते दहावी इयत्तांना सेमी इंग्रजी माध्यम होते. २००४ पासून सेमी इंग्रजी माध्यमाची वाढती गरज आणि विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेत इयत्ता पाचवीपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. यापूर्वी सुट्टीत प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांची उत्तमरीत्या तयारी करून घेतली जाते. जेणेकरून त्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना अडचणी येणार नाहीत. २०११-१२ मध्ये पहिली इयत्तेपासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. याचा विस्तार प्राथमिक शाळेपुरता मर्यादित न राहता पालकांच्या आग्रहास्तव गेल्या वर्षांपासून शाळेत छोटा शिशू, मोठा शिशू वर्गातील विद्यार्थ्यांनाही सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविण्यात येत आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित हे विषय नसतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांकडून अंकगणिताचा अभ्यास इंग्रजीतून घेण्यात येतो. आजमितीला सुभेदारवाडा शाळेतील बहुतेक विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.
मराठी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. परंतु तरीही मुलांचा कल इंग्रजी माध्यमांकडेच आहे. पुढील शिक्षणासाठी फायदा व्हावा, या हेतूने शाळेत सेमी इंग्रजीवर अधिक भर देण्यात येतो. सुभेदारवाडा शाळा कल्याणातील पहिली सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करणारी शाळा आहे. यामुळे अन्य शाळांमधील कित्येक विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी आले.
सी.एम.पुराणिक, माजी कोषाध्यक्ष, ज.ए.ई.चे संचालक मंडळ
आकडेवारी
सेमी इंग्रजी माध्यम मराठी माध्यम एकूण
पूर्वप्राथमिक ४३४ – ४३४
प्राथमिक ६५० २३२ ८८२
माध्यमिक १५६९ २९९ १८६८
इंग्रजी माध्यम शिक्षण : पूर्वप्राथमिक : विद्यार्थी संख्या- ७५
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 2:14 am