नगरविकास विभागाचे आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश

कल्याण पश्चिमेतील रेल्वेस्थानकाजवळील महापालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवरील वाचनालयाच्या ठिकाणी बेकायदा इमारत उभारतानाच संबंधित जागेच्या टीडीआरचाही वापर केल्याप्रकरणी आता नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहेत. तसेच या भूखंड घोटाळा प्रकरणाची पुणे येथील नगररचना विभागाच्या संचालकांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असेही नगरविकास विभागाने म्हटले आहे.

कल्याण पश्चिमेतील भूखंडावर गृहसंकुलाची उभारणी करताना संबंधित जमिनीचे कुलमुखत्यारधारक असलेले विकासक प्रफुल्ल शहा यांनी या भूखंडावर वाचनालयासाठी आरक्षित करण्यात आलेला भूखंड पालिकेच्या ताब्यात न देता त्यावर स्वत:च दोन इमारतींची उभारणी केली. आरक्षित भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केल्याचे दाखवून विकासकाने त्याच्या मोबदल्यात मिळवलेला टीडीआरदेखील याच भूखंडावरील बांधकामासाठी वापरला. याच टीडीआरचा पुन्हा एकदा वापर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पालिका अधिकारी आणि विकासक यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या गैरव्यवहाराचा उलगडा झाला आहे.

या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले होते. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीदेखील या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी  नगरविकास विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाचे अधिकारी अशोक खांडेकर यांनी कडोंमपा आयुक्त, पुणे येथील नगररचना विभागाचे संचालक यांना येत्या सात दिवसांत प्रकरणाची कागदपत्रे चौकशी करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.