न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपमध्ये उत्साह; शिवसेनेची कसोटी

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १५ दिवसांत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने गुरुवारी तात्काळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १६ जून रोजी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक

होणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. संख्याबळ असल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर गेल्या वर्षी भाजप बंडखोराला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला स्थायी समिती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

उल्हासनगर महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. गेल्या वर्षी भाजपच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेने भाजपच्या अधिकृत स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असतानाच शिवसेनेसोबत सत्तेत असणाऱ्या उपमहापौर भगवान भालेराव यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला होता. त्याचवेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण देत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. तर शासनाने नव्याने आदेश काढून जुन्याच सदस्यांना कारभार पाहण्याचे आदेश दिले. याविरुद्ध स्थायी समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. बुधवारी न्यायालयाने याबाबत निकाल देत येत्या १५ दिवसांत सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुरुवारी तातडीने उल्हासनगर महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर केली. येत्या १६ जून रोजी नव्या सभापतीची निवड केली जाणार आहे. त्यासाठी १४ जून रोजी अर्ज भरण्यात येतील. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुन्हा अनिश्चिततेचे राजकारण शिगेला

महापालिका निवडणुकांना अवघे ८ महिने शिल्लक असताना होऊ  घातलेल्या स्थायी समिती निवडणुकीमुळे शहरात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपविरोधात असलेले रिपाइंचे भगवान भालेराव हे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या पाठिंब्यावर उपमहापौर झाले. मात्र स्थायी समिती सभापतीपदाचे वेध लागल्याने त्यांनी महिनाभरापूर्वी भाजपच्या गोटात प्रवेश केला. एकूण १६ सदस्यीय स्थायी समितीत नगरसेवक संख्येनुसार भाजपचे ९ सदस्य आहेत. शिवसेनेचे ५ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचा प्रत्येकी १ सदस्य आहे. रिपाइंचे भालेराव हे भाजपच्या गोटात गेल्याने भाजपचे संख्याबळ १० पर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शिवसेना ६ सदस्यांवर मर्यादित राहिली आहे. हेच चित्र कायम राहिल्यास भाजप सहजरीत्या स्थायी समिती पुन्हा मिळवेल असे बोलले जाते. पुन्हा भाजपात फूट पडल्यास मात्र शिवसेनेला  फायदा होऊ शकतो.