भर पावसातही गणेश पुजेचे साहित्य आणि हार-फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांनी ठाणे शहरातील जांभळीनाका परिसरात गर्दी केली होती. त्याचबरोबर ठाणे महापालिका चौक, वर्तकनगर तसेच शहराच्या अन्य भागांतही पूजासाहित्य विक्रीच्या दुकानांपुढे गर्दी होती. अनेकजण खरेदीसाठी वाहने घेऊन बाहेर पडल्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पूजासाहित्य खरेदीसाठी भाविक वाहने घेऊन घराबाहेर पडल्यामुळे बाजारपेठेच्या दिशेने जाणाऱ्या गोल्डन डाईज नाका, मीनाताई ठाकरे चौक, कोर्ट नाका, टेंभीनाका, जांभळी नाका या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठाणे शहरातील वंदना सिनेमागृह, वृंदावन सोसायटी, जांभळी नाका, नौपाडा या पसिरात पावसाचे पाणी साचले होते. तसेच शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कामे सुरू असल्याने शुक्रवारी दुपारी कॅडबरी ते माजिवाडा भागातील महामार्गावरील वाहतूकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर मार्गावरही असेच चित्र होते.

मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता पाणी साचले होते. यामुळे या मार्गावरील वाहतूकीचा वेग मंदावला होता.

जिल्ह्य़ात शुक्रवारी दुपापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली भागात पाणी साचल्याने तासभर कोंडी झाली होती. भिवंडी शहरातील नदीनाका आणि भाजी मंडई भागातही पाणी साचले होते. बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांमध्येही शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला.

पावसामुळे पडझड

पावसामुळे खारेगाव आणि माजिवडा नाका या भागांत झाडे उन्मळून पडली. पारसिकनगर भागात एक झाड पडून मोटारीचे नुकसान झाले.

त्याचबरोबर कोपरी, पाचपाखाडी, वाघबीळ आणि नौपाडा परिसरात झाडांच्या फांद्या तुटल्या. कोलबाड भागात एका झाडाची फांदी कोसळून घराचे नुकसान झाले.

कल्याण-डोंबिवलीत वाहतूक कोंडी

गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या भाविक आणि मुसळधार पाऊस यामुळे कल्याण, डोंबिवलीतील बाजारपेठांतील रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. कल्याण-शिळफाटा राज्य रस्ता, दुर्गाडी किल्ला ते कोन-भिवंडी बाह्य़वळण रस्त्यावर शुक्रवारी सकाळी नोकरदारांच्या मोटारी आणि गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. पत्रीपूल, पलावा, दुर्गाडी, गंधारे पुलाकडील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडी वाढली होती. करोनामुळे रस्त्यावर वर्दळ कमी असेल या विचाराने बाहेर पडलेले लोक वाहतूककोंडीत अडकले होते.

भातसातून विसर्ग : भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून प्रतीसेकंद १०७.७५ घनमीटर अर्थात ३ हजार ८०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जोरदार पावसामुळे भातसा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भातसा नदीवरील सापगाव पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने शहापूर-मुरबाड या मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.