विस्तारित महामुंबईची शहरे म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात भल्यामोठय़ा रांगा लावून मतदारांनी उत्साहात आपला हक्क बजावला. मतदानानिमित्त कामावर हजर राहण्यासाठी मिळालेल्या दोन तासांच्या सवलतीचा फायदा घेत कामावर जाण्यापूर्वीच अनेकांनी मतदान केंद्रांकडे धाव घेतली. त्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत दोन्ही शहरांतील मतदानाची आकडेवारी चांगली होती. मात्र, दुपारी कडक उन्हाच्या झळांनी छळण्यास सुरुवात केल्याने मतदारांचा उत्साह काहीसा झाकोळला गेला.
अंबरनाथमध्ये पहिल्या दोन तासांत दहा टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाचा वाढता टक्का प्रस्थापितांसाठी धक्कादायक ठरण्याची भीती असल्याने सर्वच पक्षांतील विद्यमान नगरसेवक काहीसे धास्तावले होते. मात्र, कडक उन्हामुळे मतदारांनी घरातच राहणे पसंत केल्याने दुपारनंतर केंद्रांवरची गर्दी कमी झाल्याने या प्रस्थापितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अनेक ठिकाणी आपापल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवाराच्या समर्थकांनी रिक्षा तसेच चारचाकी वाहने सज्ज ठेवली होती, तर मतदान केंद्रांवर उमेदवार स्वत: हात जोडून मतदारांचे अभिवादन करताना दिसत होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून या उमेदवारांना सुरक्षित अंतरावर जाण्यास भाग पाडले. उन्हाच्या भरामुळे मतदारांचा उत्साह कमी झाल्यासारखा दिसत असला तरी याचा परिणाम मतदारांना बोलावण्यासाठी फिरणाऱ्या तसेच बूथवर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर झाला नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकावर एका रिक्षाचालकाची हत्या झाल्याच्या निषेधार्थ पूर्व विभागातील रिक्षा दुपारी दोन वाजेपर्यंत बंद होत्या. त्यामुळे नागरिकांची बरीच गैरसोय झाली. बदलापुरातही सकाळी मतदान केंद्रांवर मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच विविध पक्षांचे कार्यकर्तेही आपल्या बाजूच्या मतदारांना शोधून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेत गुंतले होते. दुपापर्यंत बदलापुरात ३० टक्के मतदान झाले होते; परंतु कडक ऊन थोडे ओसरल्यानंतर मतदानाने जोर पकडला.
या निवडणुकीत बदलापुरात शिवसेना-भाजपचे भवितव्य पणाला लागले असून या दोन्ही पक्षांच्या बदलापूर शहराबाहेरील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या गाडय़ा आपापल्या उमेदवारांच्या बूथवर गाडय़ांच्या ताफ्यांसह हजेरी लावत होते; परंतु पोलिसांचे लक्ष असल्याने दुपापर्यंत या ‘सुसज्ज’ गाडय़ांमुळे कोणताही प्रकार घडला नव्हता. बदलापुरात १५० उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले असून गुरुवारी दुपापर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.