गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जव्हारमध्ये घडली. गेल्या महिन्यात कुटुंबातील मुख्य सदस्याने गळफास घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. कुटुंबाचा आधार गेल्यामुळे स्वत:चा आणि दोन लहान मुलींचा सांभाळ कसा करायाचा हा प्रश्न रुक्षणा यांना भेडसावत होता. या विवंचनेतून ३ वर्षीय मुलगी दीपाली आणि ७ महिन्यांची वृषाली हिला विष पाजून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, या घटनेत चिमुकली वृषाली हिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

५ जुलै रोजी रुक्षणा (३०) यांनी स्वतः आणि आपल्या दोन्ही मुलीना विष पाजले असल्याची माहिती लक्ष्मी अमृत टोकरे (मृत रुक्षणाची आई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समोर आली आहे. यामध्ये मोठी मुलगी आणि रुक्षणा हिचा मृत्यू झाला असून वृषाली या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. सध्या ती बचावली असली तरी जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यानंतर जगायचे कसे?, हाताला रोजगार नाही, मुलीना जगवायचे कसे?, या प्रश्नातून या सर्व कुटुंबानेच आत्महत्या केल्याची नोंद जव्हार पोलिसांत करण्यात आली आहे.

रोजगात हमी, घरकुल योजना, रेशनवर धान्य, विधवांना पगार अशा अनेक योजना सरकार वनवासी बांधवांसाठी राबवित आहे. मात्र, या योजना किती पोकळ आहेत आणि त्या कागदावरच कशा राहतात हे या घटनेवरून समोर आले आहे. या अत्महत्येस जबाबदार सर्वच यंत्रणांच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.