|| ऋषिकेश मुळे, सागर नरेकर

ठाणे जिल्ह्य़ातील उद्योजकांत तीव्र नाराजी;  गुंतवणूकदार निरुत्सुक, मालवाहतूक खर्चात वाढ:- वाहन उद्योगासह देशातील विविध उद्योग क्षेत्रांत निर्माण झालेल्या मंदीसदृश परिस्थितीमुळे छोटय़ा उद्योजकांचे कंबरडे मोडले असतानाच रस्त्यांवरील खड्डेही त्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची दुर्दशा पाहून देशी, विदेशी गुंतवणूकदार येथील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मालाच्या ने-आणीचा खर्च भरमसाट वाढत असल्याचेही ते सांगत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ाच्या वागळे इस्टेट, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी येथील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांच्या उत्पादनात गेल्या दोन महिन्यांपासून ३० ते ४० टक्क्यांची घट झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. बाजारातील मंदीची परिस्थिती याला जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र त्याचबरोबर ठाणे पट्टय़ातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते तसेच अन्य पायाभूत सुविधांचा अभावही त्याला कारणीभूत ठरत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्य़ातील वागळे इस्टेट, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी या भागांत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये अनेक कंपन्या, उद्योग आहेत. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी अनेक उद्योजक देशी, परदेशी गुंतवणूकदारांशी बोलणी करत आहेत. मात्र, कंपन्यांना भेटी देण्यासाठी येणारे गुंतवणूकदार या परिसरातील रस्ते व अन्य प्राथमिक सुविधा पाहूनच नकार कळवत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. यातही प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे जबाबदार असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्य़ात विविध मार्गावर खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीतच वेळ वाया जात असल्याने जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींमधून तयार झालेला माल हा जेएनपीटीच्या दिशेने नेण्यासाठी वाहनचालकांकडून अवाच्या सवा भाडेआकारणी होत आहे. पूर्वी एका ठरावीक अंतरासाठी छोटा टेम्पो मालवाहतुकीकरिता जे दर आकारत असे त्याहून तिप्पट दरांची आकारणी वाहन कोंडी आणि खड्डय़ांमुळे होत आहे, असे भिवंडी पट्टय़ातील उद्योजकांनी सांगितले. अनेक मोठे मालवाहू वाहनचालक पहाटे लवकर माल वाहनात भरण्याचा आग्रह कंपनीचालकांना करतात. काही कारणास्तव माल भरण्यास उशीर झाला तर वाहनचालक कोंडीत अडकण्याची जोखीम स्वीकारत नसून मालभरणा करण्यास नकार देऊन निघून जातात. परिणामी कंपनीत तयार केलेला माल तसाच पडून राहत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

उत्पादन क्षमतेवरही परिणाम

कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार हे वाहतूक कोंडीत अडकत असल्यामुळे वेळेवर पोहचू शकत नाहीत, परिणामी उत्पादनामध्ये कपात होते आणि याचा थेट फटका कंपनीच्या आर्थिक व्यवस्थेवर होत आहे. दुसरीकडे विविध रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांना मोठय़ा खड्डय़ांतून प्रवास करावा लागत असल्याने यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे कल्याण-डोंबिवलीतील उद्योजकांकडून सांगण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांची परिस्थिती फारच भयावह आहे. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कल्याण-डोंबिवली औद्योगिक पट्टय़ात गुंतवणूकदार येण्यास फारसे तयार नाहीत. तसेच यापूर्वी येथून जी मागणी होती तीदेखील खड्डे, वाहन कोंडी यामुळे कमी होत आहे.  – देवेन सोनी, अध्यक्ष- कामा (कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरल असोसिएशन)

काही दिवसांपूर्वी नेदरलँडहून एक ग्राहक भिवंडी येथील आमच्या कंपनीमध्ये आला होता. मात्र कंपनीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास, रस्ते आणि वाहतूक कोंडी पाहून तसेच कंपनीच्या परिसरातील खड्डे पाहून त्याने आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक, मालाची ऑर्डर देण्यास नकार दिला. केवळ खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. – निनाद जयंवत, अध्यक्ष, भिवंडी चॅप्टर

अंबरनाथ औद्योगिक वसाहतीतील आनंदनगर भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमुळे औद्योगिक वसाहतीत कच्चा माल येण्यास अधिकचा कालावधी लागतो. वेळेवर कच्चा माल पोहोचला नाही तर मोठे नुकसान होते. सध्याच्या मंदीला कारण म्हणजे औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा अभाव म्हणावा लागेल.  – उमेश तायडे, अध्यक्ष, आमा (अ‍ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरल असोसिएशन)