आयरे, भोपर भागातील नाले बुजवले; भूमाफियांचा उच्छाद; पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती
डोंबिवली परिसरातील एकमेव हरितपट्टा असलेला भोपर, आयरे हा कांदळवनाने एकेकाळी बहरलेला परिसर भूमाफियांनी उघडा बोडका केल्याने या परिसरातील पर्यावरण प्रेमी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या भागातून खाडीला मिळणारे नाले बेकायदा चाळी बांधून भूमाफियांनी बुजवून टाकले आहेत. आयरे, भोपर हा सुमारे ५० एकरचा पट्टा सागरी किनारा नियमन क्षेत्रात येत आहे. ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून शासनाने हा भाग जाहीर केला आहे. तरीही या पट्टय़ात बेकायदा चाळी मोठय़ा प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत. या बांधकामांवर कोणतीही कारवाई स्थानिक पोलीस उपायुक्त कार्यालयांकडून होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका पर्यावरणप्रेमी नगरसेवकाने शासनाकडे केली आहे.
आयरे, भोपर हा भाग कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत असला तरी या भागाचे नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची शासनाने नियुक्ती केली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, सागरी किनारा नियमन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आयरे, भोपर भागाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष नसल्याचे चित्र आहे. या प्रशासकीय दुर्लक्षामुळे भूमाफियांनी या भागातील उरलासुरला कांदळवनाचा पट्टा बेकायदा चाळी बांधून नष्ट करून टाकला आहे. शहरातून सांडपाणी वाहून नेणारी गटारे, लहान नाले या चाळींमुळे बुजविण्यात आली आहेत. पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत या भागातील नगरसेवक राजन सामंत यांनी या प्रकरणी शासनाने एक चौकशी पथक नेमावे, अशी मागणी केली आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दहा वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आयुक्तालय क्षेत्रात पोलीस उपायुक्तांवर सोपवली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आयरे, भोपर भागातील भागातील नाले बुजविण्यात आले आहेत. कोपर-दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्ग खचेल अशा पद्धतीने रेती माफियांनी खाडीकिनारा उकरून काढला आहे. दिवा ते कोपर दरम्यानचा कांदळवनाचा पट्टा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. याबाबतची तक्रार नगरसेवक सामंत यांनी कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्याकडे केली आहे. तक्रार करून दीड महिना झाला तरी पोलिसांनी भूमाफियांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मानपाडा पोलिसांनी नगरसेवक सामंत यांना बोलावून फक्त जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी कारवाई कधी करणार या नगरसेवकाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुपचिळी धरली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी विशेष पथक स्थापन करून पर्यावरणाचा ऱ्हास कोठे होतो का यावर नियंत्रण ठेवायचे आहे, पण तीही अंमलबजावणी केली जात नाही.
महापालिकेचे दुर्लक्ष कायम
महापालिका प्रभाग अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या संगनमताने आयरे, भोपर पट्टय़ातील कांदळवन नष्ट करण्यात आले आहे, अशा तक्रारी आता पर्यावरण प्रेमींकडून केल्या जात आहेत. या सगळ्या प्रकरणाची शासनाने चौकशी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गुगल नकाशावर वर्षांप्रमाणे आयरे, भोपर भागाची पाहणी केली तर दर वर्षी हा हरितपट्टा भूमाफियांनी कसा नष्ट केला, हे दिसून येत आहे.
बेकायदा चाळींचा घटनाक्रम
२०११ पर्यंत आयरे, भोपर भागातील सी. आर. झेड क्षेत्रात चाळी बांधण्यास धजावत नव्हते.
२०१२ मध्ये पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदा बांधकामे सुरू.
२०१३-१४ मध्ये सर्वाधिक बेकायदा चाळी, चाळींसाठी नाला बुजविला.
मुरुड (दंडाराजापुरी) येथे सीआरझेड क्षेत्रात बेकायदा बांधकामे केली म्हणून संबंधितांना कोकण विभागाने २५ कोटींचा दंड ठोठावला होता.
खाडीपासून ५० मीटपर्यंत बांधकामास बंदी.