पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची अंबरनाथ केंद्रास अचानक भेट; अधिकारी, कंत्राटदारांचे धाबे दणाणले
गेल्या शुक्रवारपासून बंद असलेल्या अंबरनाथ एमआयडीसीमधील कंपन्यांना अकार्यक्षम उदंचन केंद्राचा फटका बसल्यानंतर दोषींवर कारवाईची मागणी पुढे येत होती. त्याचाच भाग म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या उदंचन केंद्राला दिलेल्या अचानक भेटीमुळे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले. त्यात दोषी एमआयडीसी अधिकारी आणि यापूर्वीच्या प्रकल्प चालवणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश रामदास कदम यांनी या वेळी दिले.
परदेशातील उद्योग भारतात आणण्यासाठी तसेच त्यांना हव्या त्या सुविधा देण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र औद्योगिक विकास महामंडळच कामात कुचराई करत असल्याचे समोर आले आहे. कल्याण आणि अंबरनाथ एमआयडीसीतील काही कंपन्या बंद करण्याचे आदेश गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. मात्र एमआयडीसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची शिक्षा आम्हाला का, असा सूर अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने प्रशासनाला याची गंभीर दखल घ्यावी लागली. अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिकक्षेत्रातील उदंचन केंद्र असल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील ६५ कंपन्यांना उत्पादन बंदीचे आदेश दिले. मात्र गेल्या दहा वर्षांत उदंचन केंद्रातील कंत्राटदाराच्या कामावर नियंत्रण न ठेवल्याने उदंचन केंद्र निकामी झाले असल्याने समोर आले. त्यामुळे याची गंभीर दखल घेत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अचानकपणे अंबरनाथ येथील उदंचन केंद्राला भेट दिली. या वेळी उदंचन केंद्राला जुन्या कंत्राटदाराने टाळे ठोकले असल्याचेही ‘आमा’ या संघटनेने दाखवून दिले. उदंचन केंद्रावरील टाळे तात्काळ काढून टाकण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. तसेच रामदास कदम यांनी त्या कंत्राटदारावर आणि संबंधित एमआयडीसीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांना दिले.
उदंचन केंद्र नियमांनुसार चालत नसल्याचा ठपका ठेवत त्याच्याशी संबंधित ६५ कंपन्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले होते. त्यामुळे दिवसाला सुमारे १०० कोटी आर्थिक नुकसान कंपन्यांना सोसावे लागत आहे, तसेच जवळपास ३० हजार कामगारांनाही याची झळ बसत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी कंपन्यांकडून समोर येत होती. अनेक परदेशी कंपन्या या आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच सांडपाणी बाहेर सोडत असतात. मात्र उदंचन केंद्रातील बिघाडाचा फटका कंपन्यांना का, असा सवाल अतिरिक्त अंबरनाथ उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष उमेश तायडे यांनी केला होता. तसेच उदंचन केंद्राच्या जुन्या कंत्राटदारावरही कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली होती.

गाळ सफाईसाठी लाखोंचा खर्च
उदंचन केंद्राची काळजी योग्य प्रकारे न घेतल्याने गेल्या दहा वर्षांत येथे मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गाळामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे बीओटी कंत्राटदार बदलण्यात आला. मात्र नव्या संचालकांनी वेळ न देता थेट कारवाई केल्याने ‘आमा’ संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. आता उदंचन केंद्रातील गाळ काढण्यासाठी लाखोंचा खर्च येणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नव्याने केंद्र चालवण्यासाठी घेतलेल्या कंत्राटदाराला याचा भरुदड बसणार आहे.