आशीष धनगर

ठाणे आणि आसपासच्या परिसरांत खाडी आणि नदीकिनारी उभे राहणारे विविध प्रकल्प तसेच औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे ठाणे खाडी आणि उल्हास नदी मोठय़ा प्रमाणावर प्रदूषित होत आहे. येत्या काळातही खाडी आणि नदीपात्रात मोठय़ा प्रमाणार विकास प्रकल्पांची उभारणी होणार आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने ठाणे खाडी आणि उल्हास नदीच्या प्रदूषण आणि पर्यावरण सद्य:स्थितीचा सविस्तर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका

ठाणे जिल्ह्याला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरांची तहान भागवण्यासाठी उल्हास नदी महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे विविध प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये मोठे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्पांचा समावेश आहे. कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर पट्टय़ातील औद्योगिक क्षेत्रातून सांडपाणी थेट नदी आणि खाडीपात्रात सोडले जात आहे. जिल्ह्यात उभ्या राहणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांमुळे आणि सांडपाणी थेट नदी आणि खाडीत सोडले जात असल्यामुळे ठाणे खाडी तसेच उल्हास नदीचे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे ठाणे खाडी आणि उल्हास नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने आता प्रयत्न सुरू केले आहेत.

काय करणार?

* ठाणे खाडी आणि उल्हास नदीच्या प्रदूषणाचा, त्यांच्यातील पाणी पातळीचा तसेच गाळाच्या दर्जाचा सागरी मंडळातर्फे सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.

* या अभ्यासासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सागरी मंडळाने सुरू केली आहे.

* सल्लागाराची नेमणूक पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत खाडी आणि नदीसाठी पर्यावरण व्यवस्थापन योजना तयार करून तिची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

* यापुढे सल्लागारांमार्फत ठाणे खाडी आणि उल्हास नदीवर देखरेखही ठेवली जाणार आहे.

योजना जलवाहतुकीसाठी महत्त्वाची

ठाणे जिल्ह्यात जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा ठाणे महापालिकेतर्फे केंद्र सरकारला सादरही करण्यात आला आहे. आता राज्याच्या सागरी मंडळातर्फे ठाणे खाडी आणि उल्हास नदीच्या पर्यावरण व्यवस्थापन योजनेचा अभ्यास केला जाणार आहे. अभ्यासामध्ये पाण्यात किती गाळ साचला आहे, याचा अभ्यास करून तो काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. हा गाळ काढल्यामुळे जलवाहतुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही योजना जलवाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.