ठाणे शहराला दुभाजून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील पदपथांच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रायोजकांच्या माध्यमातून महापालिकेने ‘हरित जनपथ’ या विकसित केले आहेत. त्यामुळे तीन हात नाका येथील उड्डाणपुलाजवळच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांचा परिसर हिरवागार करण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरात राबवण्यात आलेल्या ‘हरित जनपथ’ हा उपक्रम आता परिसरातील नागरिकांसाठी मॉर्निग स्पॉट म्हणून उपयुक्त ठरू लागला आहे. चालण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यातील लांबलचक ट्रॅक इथे उपलब्ध आहे. शिवाय व्यायामासाठी खुल्या व्यायामशाळेची निर्मिती इथे करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी डबल बार बसवण्यात आले असून तेथेही व्यायामाचा आस्वाद तरुणांसह ज्येष्ठ मंडळीही घेताना दिसून येतात.

ठाणेकरांना रस्त्यांवरून सुरक्षितपणे आणि निसर्गाचा आस्वाद घेत चालता यावे यासाठी ठाणे महापालिकेने हरित जनपथ योजनेसाठी कोटय़वधींचा खर्च करून हा उपक्रम राबवण्यात आला. तत्कालीन महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारण्यात आली असून त्यामुळे ठाण्याच्या

हिरवाईत अधिकच भर पडण्यास मदत झाली आहे. तीन हात नाका जंक्शनपासून ते लुईसवाडीपर्यंत महामार्ग आणि सेवारस्त्यांच्या दरम्यान दोन्ही बाजूंना नागरिकांसाठी हरित जनपथ उभारण्यात आले आहेत. ठाण्याच्या हरित जनपथावरील वृक्षवल्लीचे सौंदर्य महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही भुरळ घालते. शिवाय नागरिकांनाही सकाळच्या व्यायामासाठी त्याचा लाभ घेता येतो. ठाण्याचा हिरवा बाज कायम राहावा आणि त्यात ठाणेकरांना अधिक सुरक्षितपणे पदपथावरून चालता यावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेने राबवलेली हरित जनपथ योजना यशस्वी ठरली आहे.

शहरातील हरित जनपथवर अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य महापालिकेमार्फत बसविण्यात आले आहेत. तिथे व्यायाम करण्यासाठी पुरुषांसोबत महिलाही येत असल्याने खुल्या व्यायामशाळांचे नवे पर्व इथे पाहायला मिळते. त्यामध्ये सायकलिंग, एअर वॉकर्स, रोइंग, चेस्ट प्रेस आदी साहित्यांचा समावेश आहे. त्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा व्यायाम करणे शक्य होत आहे. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी हरित जनपथवर येणाऱ्या नागरिकांचा खुल्या व्यायामशाळांकडे ओढा वाढला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुणाईही मोठय़ा संख्येने दिसून येते. विशेष म्हणजे ताणतणाव, वाढलेले वजन यातून मुक्ती मिळण्यासाठी महिलाही खुल्या व्यायामशाळांकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळते. खासगी व्यायामशाळेचे शुल्क, प्रशिक्षकाचे शुल्क आणि आहाराचा खर्च पेलवणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र, महापालिकेच्या खुल्या व्यायामशाळांना कोणतेही शुल्क नसल्यामुळे त्यांच्यापुढे हा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच पैशांची बचत होत असल्याने अनेक जण खुल्या व्यायामशाळांचा पर्याय निवडू लागले आहेत.

सायंकाळी प्रेमी युगुलांचे जथ्थे..

सकाळी ठाण्यातील नागरिकांसाठी मॉर्निग स्पॉट असलेले हरित पथ सायंकाळी मात्र प्रेमी युगुलांच्या ताब्यात जाते. हरित जनपथावर सायंकाळी प्रेमी युगुले मोठय़ा प्रमाणात बसलेले दिसून येतात. मुळात या भागात विद्युतपुरवठा अत्यंत मिणमिणता आहे. शिवाय येथील वृक्षसंपदेमुळे विद्युतखांबावरील दिव्यांचा फारसा प्रकाश येथे पडत नाही. त्यामुळे झाडाच्या आड अंधारात प्रेमी युगुले गळ्यात गळे घालून गप्पाटप्पा करण्यात रंगलेले दिसतात. महामार्गावर असल्याने वाहने या ठिकाणी थांबत नाहीत, शिवाय सेवा रस्त्यांवर तसेच पदपथांवर सायंकाळी ठाणेकरांची फारशी वर्दळ नसते. त्यात झाडांमुळे होणाऱ्या अंधारात आडोशाला प्रेमी युगुलांचे अश्लील प्रकार सुरू असतात. गेल्या काही महिन्यांपासून पदपथाशेजारील या सेवारस्त्यांवर दुचाकी उभी करून प्रेमी युगुलांचे गुफ्तगू सुरू असते.

सुधारणांची अपेक्षा..

  • हरित जनपथावरील उद्यानाची देखभाल- दुरुस्ती करण्यात येणे गरजेचे आहे. झाडे, फुलझाडे, छोटय़ा वनस्पती, गवताची काळजी घेणे आवश्यक आहे.
  • सकाळी नागरिक चालण्यासाठी येण्यापूर्वी हरित जनपथ परिसर स्वच्छ होणे अपेक्षित आहे.
  • सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाची नेमणूक तसेच सीसीटीव्हीसारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
  • पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची चांगली व्यवस्था या परिसरात असावी.
  • नागरिकांचा सहभाग घेऊन काही नवे उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.
  • प्रकाशाची पुरेशी व्यवस्था व्हावी तसेच येथील व्यायामाचे साहित्यही तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत.

अनुभवाचे बोल..

उद्यानाची देखभाल- दुरुस्ती हवी..

हरितपथाच्या निर्मिती होण्याआधीपासून मी या परिसरात व्यायामाला येत असून हा परिसर मला नेहमीच भुरळ घालतो. व्यायामाचे योग्य ठिकाण असेही या परिसराला म्हणता येईल. इथे व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या भागात उद्यानाची देखभाल- दुरुस्ती अधिक चांगल्या पद्धतीने होण्याची गरज आहे. उद्यानातील गवत, झाडांची काळजी आणि स्वच्छता राखली जाणे गरजेचे आहे. बाजूने वाहतुकीचा रस्ता असल्याने वाहनांचा त्रास होत असला तरी पहाटेच्या वेळी या भागात पोहोचल्यास कोणताही त्रास जाणवत नाही.

– आदित्य गोसावी, तरुण

खुल्या व्यायामशाळेतील साहित्य सुधारावे..

हरित पथवरील व्यायामशाळा महिला वर्गासाठी चांगली पर्वणी ठरली आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी चालण्यासाठी आणि व्यायामासाठी येत आहे. खुल्या व्यायामशाळेच्या साहित्यांची अनेक वेळा मोडतोड झालेली दिसून येते. महापालिकेने अशा वेळी तात्काळ साहित्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच या भागातील व्यायाम साहित्यावरील व्यायामाची पद्धतही पोस्टर अथवा बोर्डवर लिहून ठेवल्यास त्याचा लाभ नागरिकांना घेता येऊ शकेल.

– सुरेखा चौधरी, महिला

कचऱ्याचा प्रश्न सोडवावा..

उद्यानात येणारी मंडळी खाद्यपदार्थ खाऊन कचरा त्याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा त्रास सहन करावा लागतो. सुट्टीच्या दिवशी, दहीहंडीच्या काळात इथे कचऱ्याचे ढीग तयार होतात. महापालिका कर्मचाऱ्यांनी ते दूर केल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. शिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहासारखी व्यवस्था या भागात असणे गरजेचे आहे.

– विभा केज्जी, ज्येष्ठ नागरिक

संध्याकाळचे वातावरणही नयनरम्य..

हरित जनपथ हा सकाळ आणि संध्याकाळीही नागरिकांसाठी व्यायामाचे चांगले ठिकाण आहे. येथील झाडांची संख्या आणि वातावरण चांगले असल्याने इथे रोज यावे असे वाटते. संध्याकाळच्या वेळात या भागात अधिक नयनरम्य वातावरण असते. या भागात पुरेसा प्रकाश उपलब्ध करून दिल्यास नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होऊ शकेल. हा परिसर लहानमोठय़ांसाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे.

– जी. ए. शानबाग, ज्येष्ठ नागरिक

रोज यावे असे वाटते..

शाळेला सुट्टी असल्यावर मी इथे येतो. व्यायामासाठी येणारे सगळे लोक पाहून इथे रोज येऊन व्यायाम करावा असे वाटते. शाळा नसेल तेव्हा मी आवर्जून वडिलांसोबत इथे येतो.

– ऋषी भानुशाली, विद्यार्थी

योग्य व्यायाम व्हावा..

तरुण चांगल्या प्रकारे व्यायाम करताना इथे दिसतात तसेच ज्येष्ठ नागरिकही खुल्या व्यायामशाळेत प्रचंड मेहनत करतात. मात्र व्यायामाचे फायदे जाणून घेऊन महिला आणि ज्येष्ठांनी व्यायाम करण्याची गरज आहे. अनावश्यकपणे शरीराला ताण देण्याचे थांबवून आवश्यक तितकाच व्यायाम करणे जरुरी आहे. आम्ही गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून इथे एकत्र येत असून सातत्याने व्यायामातील अनेक नव्या गोष्टी शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.

– रमेश दळवी, क्रीडा प्रशिक्षक