• अंबरनाथच्या तरुणाचा अभिनव उपक्रम
  • पत्रिका मातीत ‘पेरल्या’नंतर झेंडूचे रोप उगवणार

पृथ्वी हे आपले कुटुंब आहे आणि निसर्ग हा या कुटुंबातील सदस्य आहे, ही जाणीव गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांमध्येही प्रखर होऊ लागली आहे. त्यामुळेच इकोफ्रेंडली उत्सव साजरे करण्यावर आता सामान्यही भर देऊ लागले आहेत. परंतु, अंबरनाथच्या स्वप्निल बागूल यांनी आपल्या लग्नाच्या पत्रिकेतूनच पर्यावरण संवर्धनाचे बीज सर्वदूर पसरवण्याचा निर्धार केला आहे. मातीत विघटन होणाऱ्या कागदाचा वापर करून बनवलेल्या या लग्नपत्रिकेत झेंडूचे बीज रोवण्यात आले असून, हा कागद जमिनीत पुरून त्याला खतपाणी देताच झेंडूचे रोप बहरणार आहे.

लग्नानंतर पत्रिका पुढे कचऱ्यात जाते. त्यावर देवदेवतांची चित्रे असतात. त्या चित्रांचीही त्यामुळे विटंबना होते. त्यातून बीजारोपण होऊ शकणाऱ्या पत्रिकेची कल्पना सुचली. अशा प्रकारची पत्रिका अद्याप कुणी बनवून देत नाहीत. त्यामुळे पत्रिकेचे सुटे भाग मिळवून ती छापायची असे ठरले. त्यासाठी मराठवाडय़ातील एका कागद कंपनीतून झेंडूचे बीज असलेला कागद मिळवला. फक्त कागद मिळवून ती आकर्षक झाली नसती, त्यामुळे लोणावळ्यातून हाताने तयार केलेला कागद मिळत असल्याचे समजले. पुण्यात त्याचे आवरण मिळाले. छपाईही तिथेच झाली. तिन्ही भाग जोडून पत्रिका तयार केली. या पत्रिकेचा खर्चही प्रत्येकी २५ ते २७ रुपये आल्याचे स्वप्निल यांनी सांगितले. लग्नानंतर ही पत्रिका एक दिवस पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कागदाचा लगदा माती आणि खतात मिश्रित करून टाकल्यास पुढील ६ ते ७ दिवसात त्यातून झेंडूचे रोप उगवेल,  असे ते म्हणाले.