पर्यावरणप्रेमींचा आरोप; वृक्ष समितीला मुहूर्तच नाही

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ठाणे शहरात राजरोसपणे वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून बांधकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांवर विषप्रयोग सुरू असल्याचा आरोप यासंबंधीच्या याचिकाकर्त्यांनी केला आहे. ठाण्यातील रेंमड कंपनी, हिरानंदानी मेडोज, जेमिनी टॉवर, घोडबंदर, वागळे इस्टेट, राबोडी या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात छुप्या पद्धतीने वृक्षतोड सुरू असून महापालिका प्रशासन यासंबंधीच्या तक्रारींकडे डोळेझाक करत असल्याचा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात कोठेही सुरू नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केला असून यामुळे वृक्षप्रेमी आणि प्रशासकीय अधिकारी पुन्हा आमनेसामने आले आहेत.

ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने गेल्या काही वर्षांत बिल्डरांचे प्रकल्प तसेच रस्तारुंदीकरणासाठी हजारोंच्या संख्येने वृक्ष कत्तलीस परवानगी दिली आहे. शिवसेनेने आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी या मुद्दय़ावर महापालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. मुंबईस्थित एका बडय़ा बिल्डरच्या प्रकल्पासाठी मध्यंतरी शेकडो वृक्षांच्या कत्तलीस हिरवा कंदील दाखविण्यात आल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. नौपाडय़ात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती.

शहरातील काही भागांत विकास हस्तांतर हक्काच्या आधारे उभारण्यात येत असलेले रस्ते तसेच इतर सुविधांसाठी झाडांची कत्तल सुरू असल्याचा मुद्दाही सातत्याने चर्चेत येत असतो. या पाश्र्वभूमीवर शहरातील काही पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वृक्ष प्राधिकरण समितीकडून वादग्रस्त पद्धतीने झाडांच्या कत्तलीस परवानगी दिली जात असल्याचा मुद्दाही या याचिकेत मांडण्यात आला होता. त्यानंतर अशा स्वरूपाच्या वृक्षतोडीस न्यायालयाने स्थगिती दिली होती.

तोडलेल्या वृक्षांचे दहन

न्यायालयाने शहरातील वृक्षतोडीस मनाई केली असली तरी मोठय़ा प्रमाणावर छुपी वृक्षतोड सुरू असल्याचा मुद्दा यासंबंधीचे याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंबंधी पत्रव्यवहार केला असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील काही भागांमध्ये वृक्षांवर विषप्रयोग होत असून काही ठिकाणी तोडलेले वृक्ष पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. शहरातील वनसंपदेचे संवर्धन व्हावे आणि विकासाच्या नावाखाली एकेक झाड तोडताना सखोल अभ्यास व्हावा यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र शहरातील भरमसाट वृक्षतोड लक्षात घेता उच्च न्यायालयाने ही समिती बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. गेल्या चार महिन्यांमध्ये यावर कोणतीही हालचाल झालेली नाही. या सर्व गोष्टींना प्रशासकीय प्रमुख कारणीभूत आहेत, असा आरोपही जोशी यांनी केला. यासंबंधी वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. दरम्यान, अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात सुरू नाही, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आयुक्त संजीव जयस्वाल हे मंत्रालयात बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.