पर्यावरण संस्थांकडून तक्रारींचा पाऊस; दारुच्या भट्टय़ांसाठी वणवे पेटवत असल्याचा आरोप
बडय़ा नेत्यांच्या बेकायदा बांधकामांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या येऊर परिसरात सध्या तळीरामांच्या सोयीसाठी चक्कजंगल परिसरात वणवे पेटवून दुर्मीळ अशी वृक्षवल्ली नष्ट केली जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. येऊरमधील अनेक भागांमध्ये आजही गावठी दारू निर्मितीचे अड्डे आहेत. वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखत हे उद्योग राजरोसपणे सुरू असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या भागात वणवे पेटविण्याच्या प्रकारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून दारू अड्डय़ांसाठी हे सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आवडते ठिकाण असलेल्या मामा भाचा डोंगरावरील हनुमाननगर आणि रामनगर परिसरात सतत सहा दिवस एकाच ठिकाणी मानवनिर्मित वणवे पेटत असल्याच्या घटना घडत होत्या. दररोज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास येऊर जंगल परिसरातील झाडे पेटण्यास सुरुवात होते, असे स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत वणवे पेटतच रहातात. प्राण्यांच्या अधिवासाला यामुळे धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार पेटणाऱ्या वणव्यांच्या खोलाशी काही पर्यावरण संस्था गेल्या असल्या दारूभट्टय़ा उभारण्यासाठी काही समाजकंटकांकडून वणवे पेटवले जातात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जंगलात दारूभट्टी उभारण्यासाठी संबंधित परिसरातील झाडे अडसर ठरत असल्याने मोकळ्या जागेसाठी काही समाजकंटकांनी वणवे लावले असल्याचे पर्यावरणप्रेमी मित अशर यांनी सांगितले. या संदर्भात काही पर्यावरण संस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली असता, उष्माघातामुळे झाडे पेट घेतात, अशी सबब त्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, पर्यावरणप्रेमींनी यावर आवाज उठवल्यानंतर हे ‘नैसर्गिक’ वणवे संपुष्टात आल्याचे दिसून आले.

मामा भाचा डोंगर परिसरात सतत एकाच ठिकाणी एकाच वेळी वणवे पेटत असल्याचे समजल्यावर संबंधित जागेला भेट दिली असता दारूभट्टीसाठी काही नागरिक वणवे पेटवत असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाकडे सातत्याने याबाबत तक्रार केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई या संदर्भात झालेली नाही.
– मित आशर, अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर, मुंबई उच्च न्यायालय

येऊर जंगल परिसरात पेटणारे वणवे निसर्गनिर्मित आहेत. दारूभट्टीसाठी अवैधरीत्या वणवे पेटवले जात असल्याचे निदर्शनास आल्यास आणि तो विभाग वनविभागाच्या अखत्यारीत असल्यास नागरिकांवर कारवाई करण्यात येईल.
– संजय वाघमोडे, परिक्षेत्र वनअधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान