|| प्रकाश लिमये

ग्रीन यात्रा संस्थेचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी हे मूळचे मध्य प्रदेशचे. लहानपण गावी गेलेल्या त्रिपाठी यांनी कायम गावाने हिरवाई जपलेली पाहिली. गर्द वनराईचे डोंगर, गावातही डेरेदार वृक्ष. त्यामुळे शिक्षणासाठी जेव्हा मुंबई गाठली तेव्हा गावच्या आणि मुंबईच्या वातावरणातील फरक त्यांना तीव्रतेने जाणवला. मुंबईतील प्रदूषण, असह्य़ उकाडा याची प्रकर्षांने जाणीव झाली. मुंबईत होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास त्यांच्या लक्षात आला आणि पर्यावरण रक्षणासाठी काहीतरी करायचे याचा त्यांनी ध्यास घेतला.

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पर्यावरण ‘पूरक गणेशमूती’ या विषयावर कार्यशाळा घेण्यास त्यांनी सुरुवात केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु गणेशमूर्ती तयार करणे हे केवळ ठरावीक कालावधीसाठीच मर्यादित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याचे त्यांच्या मनात घोळत असतानाच २०१० मध्ये दुर्गेश गुप्ता हा सहकारी लाभला आणि मग स्थापना झाली ‘ग्रीन यात्रा संस्थे’ची. संस्थेच्या माध्यमातून मग हरित चळवळच उभारण्यात आली.

घरातील लहान मुलांनी एखादी गोष्ट अंगीकारली की मोठेही त्याचा सहजपणे स्वीकार करतात हे सत्य लक्षात आल्यावर संस्थेने मग शाळांवर आपले लक्ष केंद्रित केले. सुमारे १० हजार शाळांमधील विद्यार्थ्यांना कचराभूमी, पाणीटंचाई, विजेचा अपव्यय आदी समस्यांची जाणीव करून दिली. या समस्यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या त्या त्या ठिकाणांना भेटीदेखील आयोजित करण्यात आल्या आणि याचा सकारात्मक परिणाम मुलांवर झाल्याचे दिसून आले.

शालेय विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयीन युवकांनाही या मोहिमेत सामील करून घेण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन आदी उपक्रमांतून त्यांना सहभागी करून घेण्यात आले. त्याच सोबत महाविद्यालयात होणाऱ्या वार्षिकोत्सवात हिरवाई हा विषय मध्यवर्ती संकल्पना ठेवून कार्यक्रमाची मांडणी करण्याचा आग्रह धरण्यात आला. याच विषयाला धरून विद्यार्थ्यांची पथनाटय़देखील ठिकठिकाणी आयोजित करण्यात आली. यातून काही स्वयंसेवक संस्थेशी जोडले गेले. झोपडपट्टय़ा, रहिवासी संकुले, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. याचा फायदा असा झाला की संस्था आज सुमारे ३०० कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडली गेली आहेत.

वृक्षारोपण हा संस्थेचा मुख्य उपक्रम. भाईंदर पूर्व येथील जेसल पार्क येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यात मीरा-भाईंदर महापालिकेचीही मदत झाली. या उपक्रमाचे मुख्यत्वे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले आहे. शहरी भागात ज्याठिकाणी मोकळी जागा असेल, त्याठिकाणी संस्थेकडून मोफत वृक्षारोपण करण्यात येत. शहरी भागात विशेष करून सावली देणाऱ्या आणि फळझाडांची लागवड केली जाते. संस्थेशी कोणीही संपर्क साधला तरी संस्थेचे सदस्य त्याठिकाणी अगदी मोफत वृक्षारोपण करतात.

ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांना फायदा होईल अशा फळझाडांची लागवड करण्यास प्राधान्य दिले जाते. या वृक्षलागवडीतून पर्यावरणाचा समतोलही साधला जातो आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होतो. यासाठी संस्थेने इस्त्राईल, युरोप, जपान आदी ठिकाणच्या वृक्षलागवडीच्या तंत्रज्ञानाचा अभ्यासही केला आहे.

संस्था केवळ वृक्षलागवड करूनच थांबत नाही तर लागवडीनंतर तीन वर्षे झाडांची देखभालही केली जाते. त्यामुळेच संस्थेने आतापर्यंत लावलेल्या दीड लाख झाडांपैकी सुमारे ९० टक्के झाडे जगली आहेत. देशभरात वृक्षारोपणाचा आकडा १० कोटींवर न्यायचा संस्थेचा संकल्प आहे. लोकसहभागाशिवाय हे अशक्य आहे. त्यामुळे संस्था लवकरच यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करणार आहे. याद्वारे झाडे लावा या उपक्रमात एक कोटी लोकांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

संस्थेकडे आज पूर्णवेळ सेवाभावी वृत्तीने काम करणारे २० सदस्य आणि अर्धवेळ काम करणारे १५ सदस्य आहेत. याशिवाय असंख्य स्वयंसेवक संस्थेशी जोडले गेले असून ग्रीन यात्रा ही वेगाने पुढे येणारी मुंबई आणि परिसरातील पहिली संस्था आहे. संस्थेचा एवढा सारा पसारा सांभाळायचा म्हणजे आर्थिक बाजूदेखील तेवढीच मजबूत असणे आवश्यक आहे. याठिकाणी संस्थेशी जोडल्या गेलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचा हातभार लागतो. या कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून संस्थेला आर्थिक मदत मिळत असते आणि या मदतीमधून संस्थेचे सर्व उपक्रम पार पडत असतात.

आदिवासींना मदत

आदिवासी क्षेत्रातील कुटुंबांना घरगुती सामान आणि त्या घरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हादेखील आगळा उपक्रम संस्था राबवत असते. यासाठी नागरिकांनी त्यांच्या घरातील जुने, परंतु सुस्थितीतील घरगुती सामान दान करण्याचे आव्हान संस्थेकडून करण्यात आले आहे. हे सामान गरजू कुटुंबापर्यंत पोहोचेल याची दक्षता संस्थेकडून घेतली जाते. त्यातही आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. पालघर जिल्ह्य़ातील वाडा, तलासरी, जव्हार, मोखाडा याठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे.

प्लास्टिक बंदी २०१२ पासून

शासनाने यंदाच्या वर्षी ‘प्लास्टिक बंदी’ सुरू केली असली तरी ग्रीन यात्रा या विषयावर २०१२ पासून काम करत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी लोकांनी कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी संस्थेची धडपड सुरू असते. या उपक्रमात संस्थेचे सदस्य नागरिकांकडून रद्दी गोळा करतात आणि बदल्यात त्यांना कापडाच्या पिशव्या मोफत देतात. या पिशव्या तयार करण्याचे काम ग्रामीण भागातील गरीब महिलांना देण्यात येते आणि त्याचा मोबदलाही त्यांना देण्यात येतो.