रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलचा उपक्रम

ठाणे : रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलतर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे बदलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आबालवृद्धांनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेऊन गणेशमूर्ती तयार केल्या.

नद्यांच्या पात्रांत विघटन न होणारा कचरा टाकला जातो. नद्यांचे पात्र त्यामुळे पूर्णपणे भरले जाते. परिणामी पुराचे पाणी गाव वस्त्यांमध्ये पसरले जाते. मात्र यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे अविघटनशील विसर्जित केलेले गणेशमूर्तीचे प्लास्टर ऑफ पॅरिस होय. नागरिकांमध्ये याविषयी जागृती व्हावी याकरिता पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, असे कार्यशाळेचे आयोजक रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल तर्फे सांगण्यात आले. नागरिकांना गणपतीच्या मूर्तीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय हवा होता. यावर उपाय म्हणून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असून गेली तेरा वर्षे हा उपक्रम सातत्याने सुरू असल्याचे रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलतर्फे सांगण्यात आले.

या उपक्रमात दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यक्ती सहभागी होत असतात. शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करून त्या रंगवण्याचे काम सहभागी व्यक्ती करत असतात. त्यानंतर स्वत घडवलेली मूर्ती घरी नेऊन गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची स्थापना करतात. या कार्यशाळेत सर्व प्रशिक्षणार्थीना प्रशस्तिपत्रके देऊन गौरवण्यात आले. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या उपक्रमांचे आयोजन सध्या अनेक संस्था करतात. मात्र या उपक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियलने केल्याचे कार्यशाळेच्या आयोजकांनी सांगितले.