03 August 2020

News Flash

‘इफ्रेडीन’ निर्मात्या कंपनीचे समभाग घसरले

‘एवॉन लाइफ’मध्ये ‘इफ्रेडीन’ पावडरचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला.

सोलापूर जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यातील ‘एवॉन लाइफ सायन्सेस’ या कंपनीत ठाणे पोलिसांना ‘इफ्रेडीन’ पावडरचा बेकायदा साठा सापडला. त्यामुळे कंपनीचा कारभार चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्यावर त्याचा परिणाम झाला आहे. मागील दोन दिवसांत कंपनीच्या शेअरचा भाव तब्बल २० टक्क्य़ांनी घसरला. शनिवापर्यंत कंपनीच्या शेअरचा भाव २८ रुपये ८० पैशांच्या आसपास होता, मात्र सोमवारी ते ५ रुपये ७५ पैशांनी कोसळून २३ रुपयांपर्यंत आले आहेत. या संदर्भात कंपनी प्रशासनाने मात्र अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे.

‘एवॉन लाइफ’मध्ये ‘इफ्रेडीन’ पावडरचा साठा ठाणे पोलिसांनी जप्त केला. या पावडरची कंपनीच्या कोणत्याही रेकॉर्डवर नोंद आढळलेली नाही. या बेकायदा साठय़ाप्रकरणी कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र जगदंबाप्रसाद डिमरी आणि उच्च पदावर काम करीत असलेल्या धानेश्वर राजाराम स्वामी या दोघांना अटक केली आहे.

अहमदाबादेतील पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच जप्त केलेली सव्वा टनाची ‘इफ्रेडीन’ पावडर कंपनीतून पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात व्यवस्थापक डिमरी आणि स्वामीचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असले तरी कंपनीच्या व्यवस्थापनाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. त्यासंबंधीचा पुढील तपास ठाणे पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

कंपनीचा बचाव

दोन दिवसांपासून कंपनीसंबंधी विविध प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या असून याच पाश्र्वभूमीवर कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला पत्र पाठविले आहे. त्यात हा सर्व चोरीचा मामला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या घटनेशी कंपनीच्या व्यवस्थापनाचा कोणताही थेट संबंध नसल्याचा खुलासाही कंपनीमार्फत पोलिसांकडे करण्यात आला आहे. तसेच या सर्व प्रकरणात कंपनी प्रशासन संबंधित तपास यंत्रणांना तपासकार्यात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडे साठा, निर्मिती आणि विक्रीचे अधिकृत परवाने असल्याचेही स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:11 am

Web Title: ephedrine creator company shares fall down
टॅग Shares
Next Stories
1 ठाणे, भिवंडी व कल्याणात अधिकृत रेती उपसा पुन्हा सुरू
2 राजन किणे काँग्रेसचे नवे गटनेते
3 शाळेच्या प्रवेशद्वारावरच ‘पुढे शाळा आहे’चा फलक!
Just Now!
X