News Flash

एपिलेप्सी रुग्णांना ‘उत्तेजन’

आय. पी. एच. संचालित ‘उत्तेजन’ हा स्वमदतगट एपिलेप्सी अर्थात अपस्मार किंवा फिट्स येणाऱ्यांसाठी आहे...

| August 19, 2015 12:23 pm

yekmekanaआय. पी. एच. संचालित ‘उत्तेजन’ हा स्वमदतगट एपिलेप्सी अर्थात अपस्मार किंवा फिट्स येणाऱ्यांसाठी आहे. फिट्स हा एक मेंदूविकार आहे. हा विकार होण्यास अनेक कारणे आहेत. फिट्स कोणत्याही वयातील व्यक्तीस येऊ शकतात. काही काळ स्तब्ध होण्यापासून हातपाय झाडणे, तोंडाला फेस येईपर्यंत अवस्था असू शकतात. यावरही उपाय म्हणून अनेक उत्तमोत्तम औषधे- ऑपरेशन उपलब्ध आहेत. उपचारांचा महत्त्वाचा भाग म्हणजे मनोविकारतज्ज्ञांचे साहाय्य घेणे. तसेच स्वमदतगटाची साथ असेल तर व्यक्तीला लवकर स्वावलंबी होता येते.समाजाच्या दृष्टिकोनातून हा विकार एक कलंक असल्याचे मानले जाते. अशा सामाजिक वातावरणात एपिलेप्सी असलेली व्यक्ती एकलकोंडी होते, कोषात जाते, फिटच्या रुग्णांना त्या आजाराशी संलग्न अशा भावना ताब्यात ठेवण्यातही अडचणी येतात. या व्यक्तींना साहाय्य व्हावे, त्यांनी समाजधारेत सामील व्हावे या उद्देशाने मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते यांनी ‘उत्तेजन’ या स्वमदतगटाची स्थापना केली. ‘उत्तेजन’चे सभासदत्व विनामूल्य आहे.‘उत्तेजन’मध्ये येणारी व्यक्ती प्रथमत: चिंता, भीती, नैराश्य, ताण, असुरक्षितता, एकटेपण, भावनिक आंदोलनाने अस्वस्थ असते. त्यांना शिक्षण, नोकरी, लग्न, नातेसंबंध, सामाजिक संबंधांच्या अनेक समस्या असतात. आपले कोणी ऐकून घ्यावे, सहानुभूती मिळावी, मदत मिळावी अशा अपेक्षेने या व्यक्ती ‘उत्तेजन’चे सभासद होतात. प्रसिद्ध न्यूरोसायकॉलॉजिस्ट सायकीअॅट्रिस्ट, कौन्सिलर्स, योगतज्ज्ञ यांचे येथे मार्गदर्शन मिळते. इतर सभासदांशी मनमोकळे बोलता येते. आपला विकास सक्रिय करणारे घटक अर्थात ‘ट्रिगर्स’ कोणते आहेत, हे समजून आल्याने नियंत्रण ठेवणे शिकता येते. विचार-भावना बदलता येतात. विकार हा शत्रू नसून मित्र बनवता येतो व जीवन व्यवहार कमी वेदनादायक करता येतो. सभासदांचं मनोबल-आत्मविश्वास वाढल्याची अनेक उदाहरणे ‘उत्तेजन’ने दाखवून दिली आहेत. महाराष्ट्र राज्यस्तरावर ‘टॅलेंट कॉम्पिटिशन’ ‘उत्तेजन’ने आयोजित केली. गायन-वादन, लेखन, कविता वाचन, खेळ या स्पर्धाना चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच ‘एपिलेप्सी फाउंडेशनतर्फे’ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्येही ‘उत्तेजन’च्या अनेक सभासदांनी चमक दाखविली. ‘वेध’ उपक्रमात सभासदांनी स्वनिर्मित – ग्रीटिंग कार्ड्स, चित्रे, चॉकलेट्स, मण्यांचे शोपीस, अगरबत्ती अशा विविध वस्तूंची चांगली विक्री केली.‘उत्तेजन’मध्ये विकारग्रस्तांच्या कुटुंबीयांनासुद्धा विनामूल्य सभासदत्व दिले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे या विकारामुळे कुटुंबीयांच्या मनावरही खूप ताण असतो, भविष्याची चिंता असते. त्यांनाही मदतीची, समुपदेशनांची गरज असते. ‘‘रोजच्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी आम्हाला ‘ट्रिक्स व टिप्स मिळतात,’’ असे एका पालकाने समाधानाने सांगितले. ‘‘ ‘उत्तेजन’ हे आमचे विस्तारित कुटुंब आहे,’’ अशीही प्रतिक्रिया मिळाली. आज ‘उत्तेजन’मधील सभासद मुलांनी अर्धवट सोडलेले शिक्षण जिद्दीने पूर्ण केले आहे. काहीजण नोकरी करत आहेत. काही लग्न करून जबाबदारीने संसार करत आहेत. हे ‘उत्तेजन’चे यश मानता येईल. सुख वाटल्याने वाढते व दु:ख वाटल्याने कमी होते हे इथे तंतोतंत समजते.
मुले-पालक यांना शिक्षित करण्याबरोबर समाजालाही शिक्षित करण्यासाठी उत्तेजनने पुढाकार घेतला आहे. विविध शाळांमधून जागृती मोहीम राबविली आहे. तसेच, इतर संस्था, गृहसंकुले यांमध्येही यापुढे ही मोहीम राबवण्याचा मानस आहे. अपस्मार बाधितांच्या शिक्षणासाठी सोयी-सवलती कशा मिळवायच्या, लग्नासाठी कोणती-कशी मदत मिळू शकते यासंबंधीची माहितीसुद्धा येथे विनामूल्य दिली जाते. या कामात माझ्यासह अस्पा चंदे, डॉ. अश्विनी मराठे, रिमा रामचंद्रन यांची मोलाची साथ आहे. शाळांमधील शिक्षकांमध्ये या आजाराची जाणीव व जागृती व्हावी आणि ग्रस्त विद्यार्थ्यांना त्यांनी समजून घ्यावे यासाठी उत्तेजनने एक कार्यक्रम तयार केला आहे. जो शाळांमध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केल्यास दाखवला जातो.
‘उत्तेजन’च्या प्रवासात त्यांनाही काही मदतीची अपेक्षा जरूर आहे. या विकारावर लागणारी औषधे सवलतीच्या दरात मिळावीत. इतर मेंदू विकास बाधितांना मिळणाऱ्या सरकारी सोयी-सवलती अपस्मार बाधितांनाही मिळाव्यात. उदा. शिक्षणात, नोकरीत, प्रवासाकरता वगैरे. याकरता समाजानेही यांचा हात हाती घ्यावा, असे आम्हाला वाटते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:23 pm

Web Title: epilepsy patients incitement
Next Stories
1 सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांचे हाल
2 २७ गावांमधील वातावरण तापले
3 रस्ते अडवणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
Just Now!
X