अडवणुकीचे थांबे – कल्याण
कल्याण शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या अपयशामुळे येथील सर्वाधिक प्रवासी शेअर रिक्षाने प्रवास करतात. लाखो प्रवाशांची शहराच्या अंतर्गत भागातून वाहतूक करणाऱ्या हजारो रिक्षा दररोज रेल्वे स्थानक परिसरात दाखल होतात. त्यामुळे स्थानक परिसराला रिक्षांच्या कोंडाळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कोंडाळ्यात ठरावीक मार्गाने चालणाऱ्या शेअर रिक्षा प्रवाशांना मिळत असून मीटरप्रमाणे भाडे आकारणारी रिक्षा या शहरात अद्याप धावलेली नाही. ज्या भागात शेअर रिक्षा जात नाहीत त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना चालकांच्या मनमानीप्रमाणे भाडे द्यावे लागते. विशेष म्हणजे येथील रिक्षाचालक मालक संघटनांना राजकीय वरदहस्त लाभला असल्यामुळे या भागातील चालकांचीच मनमानी असते.
कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी शेअर रिक्षांचे थांबे उपलब्ध आहेत. स्थानक परिसरात कमीत कमी पंधरा ते वीसपेक्षा अधिक थांबे आहेत. उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर यांसह, शहाड, खडेगोळवली, बिर्ला कॉलेज, मोहने, गंधारे, नेतिवली टेकडी, लाल चौकी, आधारवाडी, नांदिवली, दुधनाका, चक्कीनाका, डोंबिवली आदी भागात जाण्यासाठी येथून रिक्षा मिळतात. इतक्या मोठय़ा प्रमाणात थांब्यांची संख्या आणि प्रत्येक थांब्यावर शंभराहून अधिक रिक्षा यामुळे हा परिसर रिक्षा थांब्याच्या कोंडाळ्यात अडकला आहे. या भागात येणाऱ्या इतर वाहनांसाठी त्यामुळे मार्गच शिल्लक राहत नसून महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीसही या रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. या परिसरातील दररोज हजार रिक्षा उभ्या असल्या तरी प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी मात्र इथे रिक्षा मिळत नाही.

जवळच्या ठिकाणी जाणाऱ्या थांब्यावर अधिक गर्दी..

शेअर रिक्षा चालवणारे बहुसंख्य रिक्षाचालक जवळच्या मार्गावर रिक्षा चालवून जास्त फेऱ्या मारून अधिक नफा कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. त्यामुळे लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना थेट रिक्षा करून रिक्षाचालक सांगेल तितके भाडे द्यावे लागते. प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो. गंधारे, मोहने, नांदिवली, खडकपाडा यांसारख्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना सायंकाळच्या वेळेस रांगेत एक ते दीड तास तिष्ठत उभे रहावे लागते. या भागात जाण्यासाठी प्रवाशांकडून ५० रुपये भाडे आकारले जाते. स्वतंत्र रिक्षा करायची झाली तर प्रवाशांकडून दीडशे रुपये भाडे आकारले जाते.

रात्रीच्या वेळेस प्रवाशांची लुबाडणूक
जंक्शन स्थानक असलेल्या कल्याणमध्ये इतर शहरातून आलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असते. शहरातील रस्ते माहीत नसल्याने अशा प्रवाशांची इथे लुट केली जाते. शहरातील अवघ्या काही मिनीटांच्या अंतरासाठी २०० ते २५० रुपयांचीही आकारणी होते. तर कल्याणातून डोंबिवलीत जाण्यासाठी चक्क पाचशे रुपयांचीही मागणी होते. कोणतेही नियम नाहीत, यंत्रणांचे नियंत्रण नाही त्यामुळे चालक संघटनांच्या नावे येथील रिक्षावाल्यांचा मनमानी कारभार सुरू असतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आरटीओ व प्रवासी संघटनांच्या वतीने प्री पेड रिक्षाप्रणाली राबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अवघ्या काही दिवसांमध्ये तो बंद झाला. कल्याण एसटी आगार व रेल्वे स्थानक परिसरातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहनच्या बसेस सुटतात. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेनेही याभागात हातपाय पसरले असले तरी त्यांची केवळ वाशी-पनवेल सेवा आहेत. शहरांतर्गत वाहतुकीचा पर्याय मात्र अद्याप कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीने भरून काढलेला नाही. त्यामुळे लुबाडणूक आणि मनमानी पद्धतीचा सामना करत कल्याणकरांचा प्रवास सुरू असतो.
शर्मिला वाळुंज,