टाळेबंदीत ठाण्यात ग्राहकांची सर्रास लूट

ठाणे : ठाणे शहरात टाळेबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची अनेक भागांत छुपी आणि चढय़ा दराने विक्री सुरू आहे. पोलीस तसेच महापालिका प्रशासनाची नजर चुकवून अनेक भाजी तसेच किराणा माल विक्रेते हा प्रकार करत आहेत. या विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ केली आहे.

टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतरही भाजी किंवा किराणा दुकानांत खरेदीसाठी गर्दी होते. त्यामुळे महापालिकेने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आताच्या टाळेबंदीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमधील अनेक भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासू लागली आहे. याचा गैरफायदा आता काही भाजी विक्रेते आणि किराणा धान्यांच्या दुकानांतील विक्रेते घेऊ लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून टाळेबंदी सुरू झाल्यानंतर काही भाजी विक्रेते पुणे आणि नाशिकहून अडत्यांच्या माध्यमातून थेट भाजी मागवीत आहेत. तर काही जण नवी मुंबईत एपीएमसी बाजारात जाऊन भाजी आणत आहेत. नाशिक आणि पुण्याहून येणारे भाज्यांचे टेम्पो हे मध्यरात्रीनंतर येतात. किरकोळ विक्रेते ही भाजी रात्री अडीच वाजेपासून सकाळी साडेसहापर्यंत विकतात. या भाजीचे दर किरकोळीतील दरापेक्षाही प्रतिकिलो २० ते २५ रुपये अधिक आकारण्यात येत आहेत. काही ठिकाणी दिवसभर घरातून भाजीविक्री सुरू असते. त्यामुळे सावरकरनगर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट तसेच कळव्यातील काही भागांत गल्लीबोळात नागरिकांची भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. घरातून भाजी देतानाही त्यावरही अधिकचे दर आकारले जात आहेत. दिवा तसेच मुंब्रा भागातही काही ठिकाणी किराणा वस्तू विक्रेत्यांकडून दुकानाचे शटर अर्धवट खुले ठेवून वस्तूंची विक्री होत आहे. या वस्तूंचा दर्जाही सुमार असतो. तर त्याच्या किमतीही चढय़ा आहेत. तलावपाळी, कॅसल मिल, लोकमान्यनगर, इंदिरानगर, यशोधननगर, कोपरी, कळवा अशा विविध भागांत हे किरकोळ विक्रेते शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सकाळी ६.३० वाजल्यापासून आपले बस्तान मांडून बसलेले पाहायला मिळतात.

गवार १०० तर भेंडी ६० रुपये किलो

भाजीची अधिकच्या दराने विक्री होत आहे. बाजारात ८० रुपये किलोने विकली जाणारी गवार १०० रुपयांना विकली जात आहे. तर ६० रुपये किलोने विकली जाणारी भेंडी आणि फ्लॉवर ८० रुपये किलोने विकली जात आहे. टोमॅटोदेखील ८० रुपये किलोने विकले जात आहेत, तर शिमला मिरचीनेही शंभरी गाठली आहे.

दुकाने तसेच भाजी बाजारात नागरिकांची गर्दी होत असल्याने आम्ही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र, त्यानंतरही छुप्या पद्धतीने विक्री होत असल्यास आणि तिथे नागरिकांची गर्दी होत असेल तर कारवाई करण्यात येईल.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.