वसई-विरार महापालिकेचा मात्र कारवाई सुरू केल्याचा दावा

गणेशोत्सवानिमित्त जाहिरातबाजी करणाऱ्या राजकीय पक्षांनी आणि विविध संघटनांनी अनधिकृत फलक लावून शहर विद्रूप केले. मात्र आता अनंत चतुर्दशी होऊन तीन दिवस झाले असूनही हे फलक हटवण्याची तसदी वसई-विरार महापालिका प्रशासन घेत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात जागोजागी फलकबाजी दिसत असली तरी महापालिकेने मात्र फलक हटवण्याची कारवाई सुरू केल्याचा दावा केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात गल्लीतल्या कार्यकर्त्यांपासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चमकोगिरी करण्यासाठी शहरात मोठमोठे फलक लावले. ‘गणेशभक्तांचे स्वागत’ या नावाखाली सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठमोठी छायाचित्रे असलेले फलक शहरात जागोजागी झळकत होते. यामुळे शहर कमालीचे विद्रूप झाले होते. फलक लावण्यात सत्ताधारी पक्षाचे नेते, नगरसेवक यांचाही समावेश होता. मात्र महापालिकेने या अनधिकृत फलकांवर कारवाई केलेली नव्हती. गणपतींचे विसर्जन झाले आता तरी या फलकांवर कारवाई करून त्यांचे विसर्जन करा, अशी मागणी सर्वसामान्य नागिरकांकडून करण्यात येत आहे. मात्र दोन दिवस उलटूनही शहरातील फलक कायम आहेत. महापालिकेने मात्र या अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे.

दोन दिवसांपासून बेकायदा फलक, बॅनर हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली. शहरात एकही अनधिकृत फलक ठेवला जाणार नाही, असेही ते म्हणाले.