23 February 2019

News Flash

शहापूरमध्ये सम-विषम पार्किंग

जुना राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली शहापूर बाजारपेठेतील दुकानांवर हातोडा पडत आला आहे.

१ मेपासून शहरात प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी तहसील कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत सहमतीने प्रायोगिक तत्त्वावर १ मेपासून शहरात सम-विषम तारखेस पार्किंग व्यवस्थेसह अनेक प्रकारच्या उपायांची अंमलबजावणी निश्चित करण्यात आली आहे.
तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार पांडुरंग बरोरा, शहापूरच्या नगराध्यक्षा योगिता धानके, पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र तेलवणे, छोटी बाजार संघटनेचे अध्यक्ष गफार शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश धानके, बाजार समितीचे सभापती नीलेश भांडे, नगरसेवक सागर सावंत, संजय सुरळके व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियत्यांसह अनेक जण उपस्थित होते.
दर दोन वर्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहापूर बाजारपेठेतील जुना राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली शहापूर बाजारपेठेतील दुकानांवर हातोडा पडत आला आहे. मात्र दर वेळी कारवाई पूर्ण झाल्यावर या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा देखभाल होत नसल्याने पुन्हा त्याच वाहतूक कोंडीला शहरवासीयांना सामोरे जावे लागत असल्याचे छोटी बाजार संघटनेचे सल्लागार संजय सुरळके व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र तेलवणे यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच आमदार पांडुरंग बरोरा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्तारुंदीकरणानंतर पुढे जे काही करायचे आहे त्याचा आराखडा तयार आहे का, असे विचारले असता तो नसल्याची कबुली त्यांनी दिली. अखेर पोलीस प्रशासनाने बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम तारखेस पार्किंगचा प्रस्ताव ठेवला.

First Published on April 29, 2016 3:10 am

Web Title: even odd parking in shahpur
टॅग Parking