महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेतले जातात. विविध चर्चासत्रे, स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाकडून केला जातो. या सगळ्यात विद्यार्थ्यांची शारीरिक जडणघडण व्हावी, विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो तो महाविद्यालयात असणारा जिमखाना. आपल्या फिटनेसविषयी जागृत असणारे तरुण विद्यार्थी महाविद्यालयातील जिमखान्याचा पुरेपूर लाभ घेतात. सध्या परीक्षांचा काळ सुरू असला तरी जिमखान्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी असते. अभ्यासाचा मानसिक आणि शारीरिक ताण विद्यार्थी जिमखान्यात येऊन दूर करतात. याच अनुषंगाने विविध महाविद्यालयांतील जिमखाने तसेच मैदानी क्रीडाप्रकारांसंदर्भातील सोयीसुविधांचा घेतलेला आढावा..

योगा आणि वेट लिफ्टिंगवर भर
चैताली शिंदे, युवा वार्ताहर
(ज्ञानसाधना महाविद्यालय)
1     ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र व्यायामशाळा आहेत. दररोज सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १ ते ४ या वेळेत विद्यार्थ्यांची जिमखान्यात हजेरी असते. ज्ञानसाधना महाविद्यालयात योगा आणि वेट लिफ्टिंग यांवर जास्त भर दिला गेला आहे. जिमखान्यात वुमन डेव्हलपमेंट सेल, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, सिव्हिल डिफेन्स विभाग असून त्या अंतर्गत अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेळेत जिमखाना उपलब्ध होत असतो. कॅरम, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस, चेस, योगा, पॉवर लिफ्टिंग यांसारख्या खेळांना प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. यावर्षी रस्सीखेच, मुष्टियुद्ध या खेळासोबत मॅरेथॉन, तायक्वांदो अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जिमखाना विभागाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठ पातळीवर प्रतिनिधित्व केले. जिमखाना विभागातर्फे कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, योगा यांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी विद्यार्थ्यांना जिमखाना विभागातर्फे टी शर्ट आणि पोषक आहार दिला जातो. सिद्धार्थ जंगम व संतोष माने या सहकाऱ्यांसोबत प्रा. मोहन मानमोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिमखान्याच्या सोई-सुविधांकडे लक्ष दिले जाते. नेहमीच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या प्रयत्नात असतो. विद्यार्थ्यांचा शारीरिकदृष्टय़ा व मानसिकदृष्टय़ा विकास व्हावा यासाठी जिमखाना विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत, असे खेळ विभाग संचालक प्रा. मोहन मानमोडे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारा जिमखाना
जतिन तावडे, युवा वार्ताहर
(वझे-केळकर महाविद्यालय)
2महाविद्यालयात वाचनालय, जिमखाना, प्रयोगशाळा, कॅन्टीन, मुलांचे कट्टे अशा अनेक गोष्टी येतात. त्यात जिमखाना म्हणजे विद्यार्थ्यांचे अतिशय आवडते ठिकाण. मुलुंड येथील वझे-केळकर महाविाद्यलय हे अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. महाविद्यालयाच्या या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीस खेळाडूंच्या मेहनतीबरोबरच महाविद्यालयातील जिमखान्याचे महत्त्वाचे योगदान आहे. जिमखाना प्रशिक्षक प्रा. गिरी आणि प्रा. मीनल यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखान्याचे कामकाज चालते. वझे महाविद्यालयातील अद्ययावत सामग्रीने युक्त असा जिमखाना म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीचे ठिकाण. जिमखान्यामार्फत सगळ्या प्रकारचे खेळ मुलांना खेळता येतात.

बॅडमिंटन कोर्टला विद्यार्थ्यांची पसंती
जिमखान्यामार्फत बॅटमिंटन कोर्टची देखरेख केली जाते. महाविद्यालयाच्या आवारातील बॅटमिंटन कोर्ट आणि पटांगण हेसुद्धा मुलांच्या आवडीचे ठिकाण आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी जिमखान्यातील इनडोअर खेळांबरोबरच फुटबॉल, क्रिकेट आणि बास्केटबॉल असे आउटडोर खेळही खेळताना दिसतात. त्याचबरोबर हार्ड वर्कआउटसाठी अद्ययावत साधनांनी युक्त अशी जिम म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. खेळाडूंबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थीही या जिममध्ये सराव करण्यासाठी येतात. जिमखाना व मैदान खेळाडूंनी सदैव गजबजलेले असते. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय असे दोन विभाग असल्याने सकाळी ९ ते १२ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि १२ ते ३ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळत असतात. वझे महाविद्यालयाच्या वेळेमध्येच खेळाडूंना सरावासाठी दिला जाणारा पुरेसा वेळ व आवश्यक साधनसामग्री हेच जिमखान्याचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. या ठिकाणी असणाऱ्या खेळीमेळीच्या आणि पोषक वातावरणामुळे श्रद्धा घुले, अमृता भुस्कुटे असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू जिमखान्याच्या माध्यमातून घडवले आहेत. विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या अधिकाधिक खिलाडू वृत्ती जागृत राहावी यासाठी दरवर्षी केवळ खेळाडूंसाठी बक्षीस समारंभ आयोजित केला जातो. बक्षीस समारंभात दरवर्षी विविध आंतरराष्ट्रीय खेळाडू महाविद्यालयातील खेळाडूंना त्यांच्या स्वत:च्या अनुभवातून प्रोत्साहित करतात.

जोशी-बेडेकरमध्ये प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र मैदाने
ऋषिकेश मुळे, युवा वार्ताहर
(जोशी-बेडेकर महाविद्यालय)
5जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाप्रमाणेच जिमखाना विभागही समृद्ध आहे. जिमखाना विभागातर्फे महाविद्यालयाच्या खेळाकडे लक्ष दिले जाते. प्रत्येक खेळासाठी असलेली स्वतंत्र मैदाने हे या महाविद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. व्हॉलीबॉल मैदान, रस्सीखेच मैदान, बीबीसी, खो-खो, कबड्डी आदी खेळ खेळण्यासाठी वेगवेगळी मैदाने महाविद्यालयाच्या आवारात आहेत. महाविद्यालयातील जिमखाना विभागातर्फे या खेळांचे आयोजन होत असते.
जिमखान्यात कॅरम बोर्ड, टेबल टेनिस, बुद्धिबळ यांसारखे खेळ आणि त्यांची साधने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जातात. त्याचसोबत जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने अनेक स्पर्धाचे आयोजन जिमखाना विभागातर्फे केले जाते. यात आंतर महाविद्यालयीन मल्लखांब, बुद्धिबळ असे विद्यार्थ्यांसाठी बैठे खेळ आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम व्हावा या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रयुक्त व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर विद्यार्थिनींसाठी देखील ठरावीक वेळात व्यायामशाळा उपलब्ध केलेली असते. मुलींना सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात, तसेच महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी जिमखाना विभागातर्फे निरनिराळ्या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक 4आणि मानसिक विकास व्हावा या अनुषंगाने निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते, असे महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख महेश पाटील यांनी सांगितले.


बांदोडकरमध्ये मुलींसाठी राखीव कॅरम बोर्ड

ठाण्याच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाचा जिमखाना निरनिराळ्या खेळांच्या साधनांनी परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांसोबतच निरोगी जीवनासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले जाते, असे योगा शिक्षक देवयानी लढे यांनी सांगितले. महाविद्यालयात मुलींसाठी राखीव कॅरम बोर्ड ठेवण्यात आलेला आहे. निरनिराळी व्यायामाची साधने व्यायामासाठी जिमखान्यामार्फत उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे प्राध्यापकांसाठी खास करून प्राध्यापक कक्षात कॅरम बोर्ड आणि व्यायामाची साधने ठेवण्यात आलेली आहेत, असे जिमखाना विभाग प्रमुख प्रा. बामणे यांनी सांगितले.

6वंदे मातरम महाविद्यालयात आरोग्य शिबीर
कोपर येथील वंदेमातरम महाविद्यालयातील जिमखान्याच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात.
महाविद्यालयात खेळासोबतच वृद्धांसाठी अनेक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय त्वायक्वांदो या खेळावर विशेष भर दिला जातो. कबड्डीसारख्या भारतीय खेळांना जिमखाना विभागातर्फे प्राधान्य देण्यात येते.

आरकेटी महाविद्यालयात योगा प्रशिक्षण
उल्हासनगर येथील आरकेटी महाविद्यालयातील जिमखाना विभागातर्फे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. महाविद्यालयातील जिमखान्यात विद्यार्थ्यांना खेळासाठी उपयुक्त असणारी साधनसामग्री पुरवली जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी योग सुरू करण्याचा निर्णय जिमखाना विभागातर्फे घेतला आहे. रस्सीखेचसारख्या शरीरमेहनतीच्या खेळातही प्रावीण्य मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाते.