प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
आसाम येथील गुवाहाटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या ‘राष्ट्रीय एकात्मता शिबिरात’ सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या स्वयंसेवकांचा आणि स्वयंसेवक प्रमुख प्राचार्य एस. वि. देशमुख यांचा विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे डॉ. अनिल पाटील आणि विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक बाबसाहेब बिडवे उपस्थित होते. विद्यपीठाच्या पदवीदान सभागृहाच्या प्रांगणामध्ये हा गौरव सोहळा पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कार आहे. या संस्कारामधून माणूस घडला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना हा केवळ दोन वर्षांकरिता उपक्रम न राहता तो नित्यनियम झाला पाहिजे. आपल्या कृतीचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला स्वयंसेवकांकडून मदत झाली पाहिजे, असे डॉ. अनिल पाटील यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील उल्लेखनीय कामगिरीचे दाखले दिल. तसेच जीवनदीप संस्थेच्या गोवेली आणि खर्डी महाविद्यालयाच्या ग्रामीण भागातील स्वयंसेवकांच्या सहभागाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी आपली मते मांडताना या शिबिरातील अनुभव सांगितले. या शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण झाली. तसेच वेळेचे व्यवस्थापन, जगाला हेवा वाटेल अशा आपल्या संस्कृतीचे महत्त्व राष्ट्रीय पातळीवर गेल्यावर समजले. या शिबिराचा उपयोग विविध भाषिक एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी होतो. यातून संस्कृतीची देवाणघेवाण होऊन एकात्मता निर्माण होते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

केळकर महाविद्यालयात दृष्टिहीनांसाठी विशेष ग्रंथालय
जतीन तावडे, युवा वार्ताहर
केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या वझे महाविद्यालयात सामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ग्रंथालयासोबतच दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांची ओळख व्हावी यासाठी ग्रंथालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वाचन करण्यासाठी सामान्य विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा पर्याय असतो. मात्र केळकर महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या दृष्टिहीनांच्या विशेष ग्रंथालयामुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना साहित्याचा अस्वाद घेता येणार आहे. या विशेष ग्रंथालयात ई-संसाधने तसेच अभ्यासाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी तीन संगणक आणि हेडफोनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या संगणक प्रणालीनुसार ‘स्क्रीन वाचक सॉफ्टवेअर’च्या साहाय्याने मॉनिटरवरील सर्व मजकूर हेडफोनच्या मदतीने ऐकता येतो. या ‘टॉकिंग सॉफ्टवेअर’चा उपयोग करून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील ई-संसाधनांचा तसेच ‘टॉकिंग बुक्स आणि ई-बुक्स’ प्रणालीचा वापर करता येणार आहे. ई-संसाधनांच्या वापराकरिता हे केंद्र असले तरीही ब्रेलमधील काही ग्रंथही येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भविष्यात या केंद्रामध्ये खास स्कॅनर आणि अद्ययावत सॉफ्टवेअरसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्कॅनर आणि सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ग्रंथांची पाने स्कॅन करून विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहे. या तंत्रज्ञान प्रणालीमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील सर्व ग्रंथांचा उपयोग करून घेता येईल. या सर्व साधनांना जोड म्हणून ब्रेल प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणकावरील आणि इंटरनेटवरील ई-संसाधनांचा वापर करता यावा. या संसाधनांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत हा वझे व्हिजन उपक्रम सुरू करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्या जरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी भविष्यात इतर दृष्टिहीनांकरिता हे केंद्र खुले करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे, अशी माहिती ग्रंथपाल प्रतोष पवार यांनी दिली.

कुणाल कोचे याला पोलीस परेड पुरस्कार
प्रतिनिधी ठाणे</strong>
उल्हासनगर एस.एस.टी. महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला कुणाल कोचे या विद्यार्थ्यांला राज्यस्तरीय पोलीस परेड पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत उल्हासनगर येथील एस.एस.टी. महाविद्यालयाचा विद्यार्थी कुणाल कोचे याला उत्कृष्ट सेक्शन कमांडर म्हणून गौरवण्यात आले. मुंबईचे अतिरिक्त महासंचालक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने एस.एस.टी. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कुणाल कोचे याचे स्वागत करण्यात आले. या वेळी एस.एस.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, एन.एस.एस. प्रोग्राम ऑफिसर नीलेश कारभारी आदी उपस्थित होते.

मॉल व्यवस्थापन प्रशिक्षणाची विद्यार्थ्यांसाठी संधी
प्रतिनिधी, ठाणे
व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता, त्यांना प्रत्यक्ष त्या क्षेत्रातील कंपन्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र सुट्टीचा कालावधी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल प्रशिक्षण (इंटर्नशिप) घेण्याकडे दिसून येतो. यासाठी ठाण्यातील विवियान मॉलतर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी विविध विभागांची दारे उघडी करून देण्यात आली आहेत. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी कंपन्यामध्ये हेलपाटा घालताना दिसून येतात. तरीही त्यांना प्रशिक्षण मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एका मोठय़ा मॉलचे संपूर्ण व्यवस्थापन पाहण्याची उत्तम संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांना मॉलमधील विपणन विभाग (मार्केटिंग), कार्य व नुकसान प्रतिबंध विभाग (ऑपरेशन्स व लॉस प्रिव्हेन्शन डिपार्टमेंट) यासाठी अर्ज करता येईल. या उपक्रमामध्ये बीकॉम, बीएमएस, बीएमएम किंवा हॉटेल मॅनेजमेंट आदी शाखेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. एक संस्था म्हणून नेहमीच कल्पक संकल्पना मांडू शकतील अशा तरुण आणि हुशार मंडळींना पाठिंबा दिला आहे व प्रोत्साहन दिले आहे. आज, रिटेल क्षेत्राची मोठी वाढ होत आहे आणि दरवर्षी या क्षेत्रात अधिकाधिक नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. आमचा हा उपक्रम या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्याला एक व्यासपीठ मिळवून देईल. तसेच विद्यार्थ्यांचे करिअर सुरू करण्यासाठी आव्हानात्मक व आकर्षक अनुभव ठरू शकेल, असे मत विवियाना मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील श्रॉफ यांनी व्यक्त केले.
उपक्रमामध्ये सहभाग घेऊन, यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती येथील अडीचशेहून अधिक ब्रँडपर्यंत पोहोचवली जाईल. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र आणि कंपनीच्या धोरणानुसार मानधन (स्टायपेंड) दिले जाईल. या व्यतिरिक्त, पात्र उमेदवारांना मॉलमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी दिली जाईल असे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले आहे. तसेच समाज माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थी थेट मॉलमध्ये जाऊन कस्टमरकेअर डेस्कला जाऊन संपर्क साधू शकतात, अशी माहिती मॉलच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली,
किन्नरी जाधव